हे काय चाललंय...

संपादकीय

राज्य शासनात विलणीकरणाच्या मुद्द्यावरून एस. टी. कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यानंतर शनिवारी (९ एप्रिल) या घटनेच्या निषेधार्थ गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी, 'जवळच असलेल्या भाजप नेत्यांच्या बंगल्यावर आम्हीही हल्ला करू शकतो', 'आम्ही हल्ले करायला सुरुवात केल्यास भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणे देखील अवघड होईल' या चिथावणीखोर वक्तव्यानंतर भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जमादार यांनी, 'अंगावर आला तर शिंगावर घेऊ' असे प्रत्युत्तर दिले आहे. एकमेकांना चिथावणी, आव्हाने देणारी वक्तव्ये इंदापूर तालुक्यातील राजकीय संस्कृतीची पातळी  दिवसेंदिवस खालावत चालल्याचे दर्शवत आहे.

मागील पाच महिन्यांपासून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोर्टाच्या निकालानंतर आक्रमक होत शुक्रवारी (८ एप्रिल) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी दगडफेक व चप्पल फेक करत अचानक हल्ला केला. हा हल्ला भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत आहे. या हल्ल्याचे पडसाद काल (९ एप्रिल) इंदापूरमध्येही उमटले. निषेध मोर्चानंतर राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी आपल्या भावना, 'जवळच असलेल्या भाजप नेत्यांच्या बंगल्यावर आम्ही देखील हल्ला करू शकतो' 'आपण हल्ले केल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणे देखील अवघड होईल' अशा चिथावणीखोर शब्दांत हर्षवर्धन पाटील आणि एकूणच भाजपला लक्ष करत व्यक्त केल्या. हल्ला न करण्यामागे शरद पवार यांचे संस्कार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी देखील राष्ट्रवादीच्या आरे ला कारे करत 'अंगावर आला तर शिंगावर घेऊ' असे प्रती आव्हान दिले. सिल्व्हर ओक वरील हल्ल्यात सरळ भाजपचा हात असल्याचे सध्या तरी सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना उगाच टार्गेट करणे अयोग्यच होते. एकंदरीतच कायद्याच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी ही वक्तव्ये राजकीय क्षेत्रासाठी नवी नसली तरी, इंदापूर तालुक्यातील वातावरण दूषित करणारी नक्कीच आहेत. शिवाय जी चूक सिल्व्हर ओक वरील पोलिसांकडून सुरक्षे संदर्भात झाली तीच चूक इंदापूर पोलिसांकडून होऊ नये यासाठी इंदापूर पोलिसांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. तर कायदा व सुव्यवस्था बिघडेल या पद्धतीने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर पोलीस दोघांनाही समज देणार का? याची देखील चर्चा आहे.

२०२४ मध्ये बारामती सुरक्षित व्हावी यासाठी एकीकडून निधीचा मारा, तर दुसरीकडून आरोपांच्या फैरी झाडात राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन पाटील यांना टार्गेट केलं जातंय. ते कमकुवत व्हावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. परिणामी तालुक्यातील वातावरण ढवळून निघतंय. नुकतेच पाटील गटातील काहींना फोडण्यात राष्ट्रवादीला यशही आले. सत्ताकेंद्रित राजकारणात सत्ता असली की आवक नी सत्ता गेली की जावक हे होतंच असतं. हर्षवर्धन पाटील समर्थकांनीही मग पाटील यांच्या निवासस्थानी एकवटत आपल्या एकनिष्ठतेचे प्रमाण देत राष्ट्रवादीसह फुटीरवाद्यांवर हल्ला चढवला. पदांची खैरात करूनही उपकार विसरल्याची बाब पाटील यांच्या जिव्हारी लागली असणार हे नक्की. हा आरोप त्यांच्यावरही केला जातोय. परिणामी संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले हर्षवर्धन पाटील हे देखील आता जशास तसे उत्तर देऊ'ची भाषा बोलू लागले आहेत. विकास कामांच्या उद्घाटन व भूमिपूजनासह विविध कारणांवरून राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते, कार्यकर्ते अनेक वेळा आमने सामने आले आहेत. वाद विकोपाला जाऊ लागलाय. एकमेकांवर हल्ले करण्याची भाषा आता होऊ लागली आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय दिशा आणि दशा बदलत असल्याचे दिसत आहे.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरही भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप आणि एकेरी टीका झाली. आमचे दुखणे काढले तर आम्ही तुमचे दुखणे काढू असे सांगत राज्यमंत्री तेरी भी चूप मेरी भी चूप हा सल्ला वजा समाज देत आहेत. भ्रष्टाचार न करण्याइतपत कोणताच राजकारणी साजूक आणि राजकारणाचे क्षेत्र स्वच्छ राहिलेले नाही हे जनतेलाही कळतंय. फक्त इडीच्या रडारवर आणला गेला तोच दोषी. त्यामुळे चूप राहण्यापेक्षा दोघांनीही एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढावीत ही जनतेची अपेक्षा आहे. तसाही मिडिया आणि कार्यकर्ते सोडले तर केवळ वाद विवाद, आरोप प्रत्यारोप ऐकण्यात जनतेला स्वारस्य नाही. शेवटी राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. पक्षाशी, विचारधारेशी एकनिष्ठतेचे दिवसही आता गेले. पक्ष बदलला की वाद मिटून जातात. नेतृत्व, विचारधारा बदलतात. शत्रू मित्र होतात. उद्या राज्यात राष्ट्रवादी भाजप युती झाली तर दोघांच्याही भूमिका बदललेल्या दिसतील. त्यामुळे द्विपक्षीय टॉप टू बॉटम सर्वांनीच टीका करताना मर्यादा सांभाळणे, तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. मालोजीराजेंच्या संस्कारक्षम इंदापूर तालुक्यातील राजकारणासाठी हल्ल्याची, शिंगावर घेण्याची तुमची भाषा ऐकून जनता म्हणत आहे हे काय चाललंय...?

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट