महापुरुषांच्या नावांची विटंबना थांबावी यासाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या हजारो कार्यकर्त्यांचा इंदापूर ते मंत्रालयापर्यंत लाँग मार्च

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१७ एप्रिल) :- दारू, गुटखा आणि गांजा या सारख्या अवैध व्यवसायाचा केंद्र असलेल्या हॉटेल, बियर बार, लॉज, पान शॉप आणि यासारख्या व्यवसायांना अथवा अशा वस्तूंना महापुरुषांची नावे देऊन पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावांचा सर्रास दुरुपयोग होत असून, महापुरुषांची विटंबना तात्काळ थांबावी यासाठी सत्यशोधक महापुरुषांची नावे 'प्रतीकं आणि नावे (THE EMBLEMS AND NAMES PREVENTATION OF IMPROPER ACT 1950) कायदा १९५०' या कायद्यात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात येत आहे. या मागणीला मूर्त स्वरूप यावे यासाठी शिवधर्म फाउंडेशनच्या हजारो कार्यकर्त्यांनी घाम फोडणाऱ्या उन्हात मुंबई येथील मंत्रालयापर्यंत लाँग मार्चला गुरुवारी (१४ एप्रिल) इंदापूर येथून सुरुवात केली.

संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांसारख्या सत्यशोधक महापुरुषांची नावे वर नमूद कायद्यात समाविष्ट करावी ही मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे. त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी गुरुवारी (१४ एप्रिल) इंदापूर ते मंत्रालयापर्यंत लाँग मार्चला सुरुवात केली. इंदापूर शहरातील इंद्रेश्वर मंदिरातील मालोजीराजेंच्या पादुकांचे दर्शन घेऊन सुरू झालेली ही पदयात्रा २५ एप्रिल रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. इंदापूर ते मंत्रालय दरम्यान अनेक युवक या लाँग मार्चमध्ये सामिल होणार आहेत. एकीकडे हिंदू आणि दुसरीकडे मुस्लिम व्यक्तीने हिरवा झंडा दाखवल्यानंतर या लाँग मार्चला सुरुवात करून इंदापूरची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा शिवधर्म फाउंडेशनने अबाधित ठेवली.

या कायद्यान्वये देशाची राष्ट्रीय प्रतिकं, बोधचिन्हे आणि कायद्यात उल्लेखित नावांच्या अनुचित वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कायद्यात महापुरुषांची नावे समाविष्ट केल्यास महापुरुषांची नावे कोणत्याही व्यवसायांना अथवा वस्तूंना देण्यावर प्रतिबंध लागणार आहे. मात्र यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने संघराज्य (केंद्र) शासनाला शिफारस करावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन राज्य शासनाला करणार आहे. या मागणीला लहुजी शक्ती सेना आणि इंदापूर शिवसेनेसह अनेक सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. मागील दीड वर्षांपासून आपण राज्य शासनाला यासंबंधी निवेदन देत आहोत. आपली मागणी मान्य न झाल्यास आपण आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा पवित्रा घेऊ असे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे.

संभाजी बिडी वरील संभाजी महाराजांचे नाव बदलण्यास शिवधर्म फाऊंडेशनने केले होते आंदोलन

संभाजी बिडी' या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेत शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक आण्णा काटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवप्रेमींनी सप्टेंबर २०२० मध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषण केलं होतं. त्यांच्या या लढ्यानंतर साबळे-वाघिरे कंपनीने गुडघे टेकत या बिडीच्या नावातून संभाजी महाराजांचे नाव वगळून बिडीचे नामकरण 'साबळे बिडी' असे केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट