प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इंदापूर शहरातील ८९७ जणांना घरकुल मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर (१४ एप्रिल) :- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इंदापूर शहरातील ८९७ जणांना घरकुल मंजूर झाल्याची माहिती नुकतीच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून, प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction - स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत ३०९ लाभार्थी हे यादी क्रमांक २ - (Detailed Project Report - सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना (AHP - Affordable Housing in Partnership - भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण ५८८ लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहेत. यामध्ये इंदापूर शहरात ५ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे अशा सर्व लाभार्थ्यांचा समावेश आहेत.
हे देखील वाचा - उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये भिमानगर येथील १५ वर्षीय युवक वाहून गेला
यामध्ये ५८८ घरांचा हा भव्य प्रकल्प इंदापूर नगरपरिषद हद्दीत नियोजित असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपलब्ध असणार आहेत. ह्या प्रकल्पात विविध क्षेत्रफळांचे एकूण ४८ दुकाने असून त्यामुळे शहरातील लघू व्यावसायिकांना उत्तम व नागरिकांना पूरक अशी व्यावसायिक संधी लाभणार आहे.
दोन्ही प्रकल्प हे २१ मार्च २०२२ रोजी गृह निर्माण विभाग, मंत्रालय येथे राज्य स्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती (State Level Sanctioning and Monitoring Committee - SLSMC) ह्यांच्या बैठकीत मंजूर होऊन, ३० मार्च २०२२ रोजी केंद्रीय गृह निर्माण मंत्रालय दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंजुरी व सनियंत्रण समिती (Central Sanctioning and Monitoring Committee - CSMC) च्या ६० व्या बैठकीत मंजूर झाले असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
हे देखील वाचा - उजनी धरण पाहण्यासाठी आलेल्या महिलेचे ८ तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
सदर मंजुरी अन्वये दोन्ही प्रकल्पास प्रति लाभार्थी राज्य शासनाकडून १ लाख रुपये, तर केंद्र शासनाकडून १.५ लाख रुपये, असे एकूण प्रति लाभार्थी २.५ लाख रुपये प्रमाणे एकूण २२.४२५ कोटी रु. प्राप्त होणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा