२०१९ मध्ये मामांना मारुतीराय पावले; त्यामुळेच मारुतीरायांना नारळांचे तोरण बांधून मामांनी त्याचे नवस फेडले
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (३० एप्रिल) :- 'मामा जोपर्यंत निवडून येऊन मारुतीराया तुला नारळांचा तोरण बांधत नाहीत तोपर्यंत मी मंदिरात पाय ठेवणार नाही' असा नवस मारुतीरायांना करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील एका सामान्य व्यक्तीचा नवस तब्बल अडीच वर्षांनी फेडण्याचा योग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आला. इंदापूर तालुक्यातील निंबोळी येथील राजेंद्र चव्हाण यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्व गावातील मारुती मंदिरात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे निवडून यावेत यासाठी हा नवस केला होता. या अटीतटीच्या झालेल्या लढतीत दत्तात्रय भरणे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दत्तात्रय भरणे निंबोळी या ठिकाणी आले होते. दरम्यान, दिपक पंढरीनाथ खाडे व रुपेश शिवाजी घंबरे यांनी राजेंद्र सुभेदार चव्हाण यांनी गावातील मारुतीरायांना 'जो पर्यंत मामा निवडून येत नाहीत आणि मारुतीरायांच्या चरणी नारळांचे तोरण बांधत नाहीत तोपर्यंत मंदिरात पाय ठेवणार नाही' असा नवस केल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांना दिली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भरणे यांनी अटीतटीच्या लढतीत ३ हजारांच्या फरकाने विजय संपादित केला होता. त्यामुळे खरंच मारुतीराय नवसाला पावले असेच म्हणावे लागेल.
मारुती भक्त राजेंद्र चव्हाण यांनी मामांच्या प्रेमापायी नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल अडीच वर्ष मारुती मंदिरात पाय ठेवला नव्हता. दरम्यान, या नवसाची माहिती सामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रय भरणे यांना अडीच वर्षानंतर मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भरणे यांनी लागलीच आपल्या गाड्यांचा ताफा मारुतीरायांच्या मंदिराकडे वळवला आणि चव्हाण यांचा नवस पूर्ण केला. त्यामुळे '२०१९ मध्ये मारुतीराय भरणे यांना पावले, म्हणूनच मामांनी मारुतीरायांच्या चरणी नारळांचे तोरण बांधले अशी चर्चा सुरू आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा