वालचंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१५ एप्रिल) :- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी रुपये तातडीने मंजूर करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल (१४ एप्रिल) दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित जयंती कार्यक्रमाप्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी ग्वाही दिली. वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचेही भरणे यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय भरणे यांनी, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी राहिल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे म्हटले. कोट्यावधी लोकांचे प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे. या उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने १० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची जाहिर ग्वाही भरणे यांनी उपस्थितांना दिली. याप्रसंगी भरणे यांनी, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले.

हे देखील वाचा:- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इंदापूर शहरातील ८९७ जणांना घरकुल मंजूर

यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीजचे एम. डी. चिराग दोशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, फॅक्टरी मॅनेजर धिरज केसकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरपा लातुरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, इंदापूर तालूका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट