दुर्दैवी - इंदापूर अर्बनमध्ये खाते उघडण्यासाठी आलेल्या दोघा मित्रांना माने पेट्रोल पंपासमोर रेंज रोव्हरने चिरडले; एकाचा मृत्यू, तर एक मित्र गंभीर जखमी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (८ एप्रिल) :- इंदापूर अर्बनमध्ये खाते उघडण्यासाठी येत असलेल्या दोघा मित्रांचा पुणे सोलापूर हायवेवरील गलांडवाडी नं. १ पाटीजवळ असलेल्या माने पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या रेंज रोव्हर इवॉक या चारचाकीने चिरडले असून, या अपघातात एका मित्राचा मृत्यू, तर एक मित्र गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (७ एप्रिल) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ चंद्रकांत पवार (रा. गुलमोहरवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, रोहित चंद्रकांत दळवी (सध्या रा. पोमल वाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, मुळ रा. केडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ पवार आणि रोहित दळवी हे दोघे मित्र (दोघांचे वय अंदाजे २८ वर्ष) इंदापूर अर्बन बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्या एच एफ डिलक्स दुचाकीवर (MH-11-CE-4450) इंदापूर येथे निघाले होते. गुरुवारी (७ एप्रिल) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गलांडवाडी नं १ हद्दीतील माने पेट्रोल पंपावर त्यांनी आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकून सर्विस रोड व हायवे ओलांडून इंदापूरच्या दिशेला वळले असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या का रंगाच्या रेंज रोव्हर इवॉक या चारचाकीने (MH-46-K-0001) त्यांना उडवले. यामध्ये दोघेही मित्र गंभीर झाले होते. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ पिकअपमधून उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमनाथ पवार याला डॉक्टरांनी मयत असल्याचे घोषित केले. तर रोहित दळवी याला खाजगी रुग्णवाहिकेतून अकलूज येथील डॉ. इनामदार यांच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे.
त्यामुळे जखमी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकाचे पाय पकडले?
घटना समजताच घटनास्थळी व तदनंतर तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पोहोचलेले खिलारे गुरुजी या खाजगी रुग्णवाहिकेचे चालक नितीन खिलारे यांनी गंभीर जखमी असलेल्या रोहित दळवी या युवकाला त्याचे नातेवाईक येण्याची वाट न पाहता स्वतःच्या जबाबदारीवर अकलूज येथील अश्विनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. दाखल केल्याच्या एक ते दीड तासानंतर रोहितचे नातेवाईक अकलूज येथील रुग्णालयात पोहोचले. येता क्षणी त्यांनी नितीन खिलारे यांचे पाय धरत त्यांचे आभार मानले. रोहितसाठी देवदूत ठरलेल्या नितीन खिलारे यांनी वेळीच निर्णय घेतला नसता तर कदाचित रोहितही....रुग्णसेवेत स्वतःला झोकून दिलेले, सेवेत तत्पर व हजारो रुग्णांसाठी देवदूत ठरलेले नितीन खिलारे यांना मुत्सुद्देगिरीच्या टीमचाही मानाचा सलाम.
(पत्रकारांना नम्र विनंती - परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा