गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलीसांना ग्राम सुरक्षा दलाच्या यंत्रणेची गरज
पोलिसांची अपुरी संख्या आणि कामाचा व्याप पाहता ग्राम सुरक्षा दल ठरेल प्रभावी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१६ एप्रिल) :- इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा वाढलेला सुळसुळाट आणि पोलिसांची अपुरी संख्या व कामाचा व्याप पाहता इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्राम सुरक्षा दलाची यंत्रणा कार्यरत करणे सद्यस्थितीला गरजेचे झाले आहे. मागील काही काळात चोरट्यांनी घरफोडी आणि सशस्त्र दरोड्यांसह दुचाकी वाहने, शेतातील कृषी पंप, विद्युत केबल, डिझेल, शालेय साहित्य आणि शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर हात साफ केला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीती, असुरक्षिततेची भावना आणि तीव्र नाराजी वाढू लागली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलिसांना ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीची गरज आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात इंदापूर शहरासह जवळपास ७३ लहान मोठी गावे आणि अनेक वाड्या वस्त्या आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून केवळ ७५ च्या आसपास स्टाफ असून, कामाची व्याप्ती, व्याप आणि लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचा स्टाफ फारच कमी आहे. त्यातच रजा, सिक यावर गेलेले कर्मचारी आणि साप्ताहिक सुट्टीमुळे पोलिसांची संख्या अजूनच कमी होत आहे. पोलिसांवर गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच, ठाणे अंमलदार, सबजेलसाठी गार्ड, वेगवेगळे बंदोबस्त, रात्रगस्त या सर्व कामांचा भार आहे. परिणामी गुन्ह्यांचे प्रमाण आणि पोलिसांवरील ताण दोन्ही वाढले आहेत. त्यामुळे ज्या त्या भागातील स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्राम सुरक्षा दलाची यंत्रणा उभारणे पोलीस आणि नागरिक दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
इंदापूर पोलिसांनी अनेक किचकट गुन्ह्यांचा छडा बड्या शिताफीने लावला असला आहे. पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाची संकल्पना राबविल्यास हद्दीतील तळागाळातील अपडेट्स मिळण्यासाठी पोलिसांना मदत होणार असून, चोऱ्या, दरोडे, अवैध व्यवसाय यांच्यासह समाज विघातक कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी देखील पोलिसांना मोठा हातभार लागणार आहे. सोबतच पोलिसांविषयी आत्मियता वाढून पोलीस मित्र ही संकल्पना रुजण्यास मदत होईल. घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे, गावातील कार्यक्रम आणि घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे, अफवांना आळा घालणे, नागरिकांशी जलद संवाद साधता येणे पोलीस प्रशासनाला शक्य होईल. त्यासाठी लवकरात लवकर ही यंत्रणा कार्यरत करणे फायदेशीर ठरणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा