शिक्षक पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाला विकासात्मक कामांवर भर देण्याचा राज्यमंत्र्यांचा सल्ला
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (३० एप्रिल) :- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर निवडून गेलेल्या संचालक मंडळाने संस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा. त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. काल (२९ एप्रिल) भरणेवाडी (ता. इंदापूर) शिक्षक पतसंस्थेवर निवडून आलेल्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भरणे यांनी वरील मत व्यक्त केले.
२४ एप्रिल रोजी झालेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत भरणे समर्थक स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सत्ताधारी हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलला २१-० ने व्हाईट वॉश देत इतिहास घडविला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भरणे यांच्या निवासस्थानी नवनियुक्त संचालक मंडळाच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भरणे यांनी, तालुक्यातील शिक्षकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून कोट्यावधींची उलाढाल असलेली संस्था तुमच्या हाती सोपवली असल्याचे सांगताना, संस्थेच्या माध्यमातून शहराच्या ठिकाणी असलेले व्यापारी संकुल, मंगल कार्यालय पारदर्शीपणे सांभाळण्याचा, शिक्षकांना केला जाणारा पतपुरवठा सूक्ष्मपणे चालवून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करण्याचा आणि एकूणच नवनियुक्त संचालक मंडळाला संस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर देण्याचा सल्ला नवनियुक्त संचालक मंडळाला दिला. यावेळी संचालक मंडळाला वाटेल ती मदत करण्याचे आश्वासन भरणे यांनी दिले.
यावेळी नियोजन मंडळ सदस्य सचिन सपकाळ, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शिक्षक संघाचे नानासाहेब नरुटे, नानासाहेब दराडे, दत्तात्रय तोरस्कर, सुरेश भोंग, अनिल जाधव, सहदेव शिंदे, सुहास मोरे, सतीश शिंदे, अनिल रुपनवर, मिलिंद देडगे, फिरोज मुलाणी, सुप्रिया आगवणे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा