ब्रेकिंग - कर्मयोगी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक; शेतकऱ्यांनी काटा बंद पाडला


मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

गागरगांव (२ नोव्हेंबर) :- इंदापूर तालुक्यासह आसपासच्या अनेक तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम कारखान्याचा गाळपाचा दुसरा हंगाम सुरू झाला तरी न मिळाल्याने आज अखेर शेतकऱ्यांच्या रागाचा उद्रेक इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात बघायला मिळाला. दिवाळी उद्यावर आली असताना बिलाची रक्कम अनेक हेलपाट्या आणि अनेक विनवण्यानंतरही पदरी न पडल्याने आज शेवटी इंदापूर, माढा, कर्जत, करमाळा आणि एकूणच आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी कर्मयोगीचा काटा बंद पाडला. बिले जमा झाल्याखेरीज काटा सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी यावेळी घेतला. त्यामुळे भाजपमध्ये गेल्याने हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असली तरी कर्मयोगी कारखान्याला ऊस पाठवणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाल्याचे दिसत आहे.

पत्रकारांशी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या इलाजासाठीही आपल्याकडे पैसे नसल्याचे व कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हाता पाया पडूनही आपले गाऱ्हाणे ऐकण्यात न आल्याचे म्हटले. ट्रॅक्टर चालकांनी मागील दोन वर्षांपासून आपल्याला दमडी न मिळाल्याने सांगताना, आपल्या वडिलांच्या इलाजासाठी पाहिजे असलेली रक्कम आज वडिलांचे निधन झाल्यानंतरही न मिळाल्याचे संतप्त होऊन म्हटले. अनेकवेळा अनेक बँकांची खाती, पुस्तके आमच्याकडून घेण्यात आली मात्र या खात्यांवर रक्कम अद्यापही आली नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले.

यावेळी दिलेले चेक बाऊन्स झाल्याचे सांगताना अनेक शेतकरी संतप्त झाले होते. कारखाना आपल्याला निव्वळ खेळवत, मूर्ख बनवत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. आपण ऊस कोणत्याही कारखान्याला पाठवू मात्र कर्मयोगीवर पाठवणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. त्यामुळे ऐन हंगामात कारखान्याच्या बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त संचालक मंडळासमोर चांगलाच पेच निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या व्यथा हे संचालक मंडळ ऐकणार का? शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळणार का? शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

पत्रकारांना आत जाण्यास केला मज्जाव

या प्रकरणाची माहिती पत्रकारांना मिळताच कारखान्याच्या गेटवर पोहोचलेल्या पत्रकारांना सुरक्षा रक्षकांकरवी गेटवरच अडवण्यात आले. पत्रकारांना अनेक तास गेटवरच ताटकळत थांबवण्यात आले. शेवटी पत्रकारांनी कारखान्याच्या वॉल कंपाऊंडवरून उड्या मारत आंदोलनाच्या ठिकाणी जात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या व्यथा अशाच कारखान्याच्या कंपाऊंडमध्ये कोंडल्या गेल्या असत्या.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट