स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारावरून इंदापूर नगरपरिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये फ्लॅक्स वॉर; विरोधकांचे अस्तित्व दिसल्याची शहरात चर्चा

विरोधकांनी लावलेला फलक

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२१ नोव्हेंबर) :- केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण (२०२१) अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेसंदर्भात विशेष उपक्रम राबवत संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर देशपातळीवर चौथ्यांदा नावलौकिक मिळविला असून, नगरपरिषदेच्या अभिनंदनाचे फलक संपूर्ण शहरात लागले असताना आता विरोधकांनी हा पुरस्कार खोटा असल्याचा आरोप करत शहरातील मुख्य चौकांमध्ये शहरातील कचऱ्याच्या ठिकाणांचे फोटो पुरस्काराच्या फोटोसह फलकाच्या माध्यमातून लावल्याने सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा फ्लॅक्स वॉर इंदापूरकरांना सध्या पाहायला मिळतोय.

सलग चौथ्यांदा कचरामुक्त शहर म्हणून देशपातळीवर मानांकन मिळाल्याने काल (२० नोव्हेंबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मुख्याधिकारी रामराजे कापरे, विद्यमान नगरसेवक भरत शहा आणि जावेद शेख यांनी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला होता. तदनंतर संपूर्ण शहरात अभिनंदनाचे फलक 

सत्ताधाऱ्यांनी लावलेला फलक

सत्ताधाऱ्यांकडून तसेच त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले होते. याला २४ तास उलटत नाही तोपर्यंतच विरोधकांनी पुरस्कार घेतानाचा फोटो शहरातील कचऱ्याच्या ठिकाणांच्या फोटोसह फ्लॅक्सच्या माध्यमातून 'सत्ताधारी यांचे स्वच्छ इंदापूर सुंदर इंदापूर नगरीत हार्दिक स्वागत' या मथळ्याखाली लावत स्वच्छतेचा हा पुरस्कार खोटा असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला आहे. या फ्लॅक्स वॉरबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही प्रतिक्रिया अद्याप मिळू शकली नाही.

हे फ्लॅक्स वॉर सध्या चर्चेचा विषय ठरत असून, मागील ५ वर्षात प्रथमच विरोधकांनी आपले अस्तित्व दाखवत अशा पध्दतीने सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मात्र हा फ्लॅक्स वॉर विरोधकांनी केलेला केविलवाणा प्रयत्न असून, हे दुसरं तिसरं काही नाही, 'इलेक्शन करिब है' याची जाणीव इंदापूरकरांना करून देत असल्याची, तसेच मागील ५ वर्ष गप्प असलेल्या विरोधकांना आत्ताच कशी जाग आली? अशी चर्चा इंदापूर शहरातील नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट