विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे; भिमाई आश्रमशाळेत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात न्यायाधीश पी. एल. पाटील यांचे प्रतिपादन
| कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश पी. एल. पाटील यांचा सत्कार करताना ॲड. राहुल मखरे |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१६ नोव्हेंबर) :- शैक्षणिक काळात विद्यार्थ्यांनी बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील राहणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन इंदापूर येथील दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी इंदापूर शहरातील भिमाई आश्रम शाळेमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलातील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ इंदापूर यांच्या वतीने आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय भाषणात केले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसह उपस्थितांना कायदेविषयक विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर न्यायालयाच्या सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंदापूर दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी भूषविले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना इंदापूर येथील दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील यांनी, विद्यार्थी दशेतील मुलांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा सल्ला देताना, शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी भविष्यात काय व्हायचे याबाबतचे ध्येय निश्चित करून बाह्य गोष्टीकडे आकर्षित न होता ध्येयपूर्तीकडे वाटचाल करणे महत्वाचे असल्याचा महत्वपूर्ण सल्ला दिला. तर श्रीमती वडगावकर (सह दिवाणी न्यायाधीश, न्यायालय, इंदापूर) यांनी, आजही समाजाला मुलांच्या हक्काची पुरेशी माहिती नसल्याचे व कायद्यामध्ये बालकांच्या हक्क आणि अधिकाराची तरतूद केली असल्याचे म्हटले. सोबतच, बालकांना जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार आणि सहभागाच्या अधिकारांची तरतूद असल्याचे म्हटले.
याप्रसंगी ॲड. आशुतोष भोसले यांनी बालकांचे हक्क व मोफत शिक्षणाचा अधिकार या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी आणि आभार ॲड. समीर टिळेकर यांनी मानले.
या कार्यक्रमास ॲड. प्रमोद खरात (अध्यक्ष, वकील संघटना इंदापूर ), ॲड. एन. जी. शहा, ॲड. प्रकाश वाघमोडे, ॲड. धनंजय विंचू, ॲड. शशिकांत साबळे, ॲड. कुंडलिक मारकड, ॲड. जमीर मुलाणी, ॲड. रवींद्र कोकरे, ॲड. आशुतोष भोसले, ॲड. आसिफ बागवान, ॲड. प्रिया शिंदे- मखरे, ॲड. किरण लोंढे, ॲड. सुरज मखरे व इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), संचालक गोरख तिकोटे, सचिव ॲड. समीर मखरे, संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा