इंदापूर पोलीसांच्या तत्परतेमुळे वाचले अपघातातील जखमींचे प्राण; उपजिल्हा रुग्णालयाची अब्रू मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर
| पोलीसांनी आपल्या खाजगी वाहनातून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२७ नोव्हेंबर) :- गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पटाईत असलेल्या इंदापूर पोलीसांची तत्परता आणि माणुसकी पुन्हा एकदा समोर आली असून, काल (२६ नोव्हेंबर) इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई आश्रम शाळेच्या चौकात झालेल्या अपघातानंतर भर रस्त्यात वाहनाअभावी विव्हळत पडलेल्या जखमींबरोबर माणुसकीही दम तोडत असताना केवळ इंदापूर पोलीस ठाण्यातील तिघा देवदूतांनी दाखवलेली तत्परतेमुळे जखमींसह माणुसकीची लाजही शाबूत राहिली. पोलीसांनी वेळेवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने अपघातातील जखमींचे प्राण वाचले असे तरी, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जखमींना उपचार मिळण्यास बराच वेळ वाट पाहावी लागली हे दुर्दैव.
भिवंडीहून भाविकांना घेऊन देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेली खाजगी बस इंदापूर शहराच्या बायपासवरील भिमाई चौकात सायंकाळी सव्वापाच वाजता चहापणासाठी थांबली असताना बसमधील माही केशरनाथ पाटील (१३ वर्षे) आणि आदी रुपेश बाबरे (१० वर्षे) हे दोघे लहानगे जवळच असलेल्या फळविक्रेत्याकडे पेरू घेण्यासाठी थांबले होते. दरम्यान, पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या ट्रकचा पाटा तुटल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि क्षणार्धात ट्रकने या दोघा लहानग्यांसह वयोवृद्ध फळविक्रेत्या महिलेलाही धडक दिली. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नसल्याने जखमी बराच वेळ रस्त्यावरच रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. मात्र जवळच्याच हॉटेलमध्ये जेवण करत असलेले इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मनोज प्रविण गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रोशन नवनाथ मुटेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण संजय शिंगाडे या इंदापूर पोलीस ठाण्याच्या तिघा देवदूतांनी घटना समजताच वेळ न दवडता आणि रुग्णवाहिकेची वाट न पाहता स्वतः जखमींना उचलत आपल्या खाजगी वाहनातून तात्काळ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकलूजच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र खाजगी दवाखान्यांच्या विळख्यात सापडलेल्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची अब्रू मात्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसले. कायद्याला फाट्याने मारत शासकीय रुग्णालयाच्या गेटसमोरच आपला खाजगी दवाखाना थाटलेल्या या डॉक्टरने आपल्या खाजगी दवाखान्यातील रुग्णाच्या फिकीरीत अपघातातील जखमींना उपचार देण्यास जवळपास अर्धा तास उशीर केला. विशेष म्हणजे जखमींना पाहूनही हे महाशय फोनवर बोलत बोलत तेथून खुशाल निघून गेल्याचे आणि तब्बल अर्ध्या तासानंतर उपचाराअभावी रुग्णालयातच विव्हळत पडलेल्या जखमींपाशी प्रकटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडीमारानंतर उडवाउडवीची उत्तरे देत पुन्हा हे महाशह रुग्णालयातून गायबही झाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा