सत्तेत सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य; अॅड. राहुल मखरे यांचा राष्ट्रवादीकडे इशारा
| पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. राहुल मखरे |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१० नोव्हेंबर) :- व्यक्तिगत स्तरावर कोणाशीही आपले वैर नसले तरी, गल्ली ते दिल्लीपर्यंत महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या व सामान्यांशी निगडित अनेक समस्यांना जबाबदार असलेल्या भाजपचे समर्थन शक्य नसून, स्थानिक पातळीवर आपण कमळाला कसल्याही परिस्थितीत फुलू देणार नसल्याचे अॅड. राहुल मखरे यांनी स्पष्ट केले असून, सत्तेत सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य असल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या त्यांनी राष्ट्रवादीशी युतीचे संकेत दिले आहेत. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (७ नोव्हेंबर) इंदापूर शहरातील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीने रविवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. २०१६ च्या नगरपरिषद निवडणुकीत बहुजन मुक्ती पार्टीचे अनेक उमेदवार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले होते, किंबहुना बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे अनेकांना पराभूतही व्हावे लागले होते. यावेळी परिस्थिती अधिक चांगली असून, आमचे किमान ५ ते ७ नगरसेवक निवडून येतील असा विश्वास, तर भाजप सर्व प्रयत्नांती केवळ ३ ते ४ जागांपर्यंत मर्यादित राहील असे भाकीत अॅड. मखरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
एकही नगरसेवक नसताना मागच्या ५ वर्षात खऱ्या अर्थी आम्हीच विरोधकाच्या भूमिकेत होतो. रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचार आम्हीच उघडकीस आणला. सामान्यांशी निगडित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंदोलनेही आम्हीच केली. आतापर्यंत इंदापूरकरांची केवळ फसवणूक होत आली असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत मात्र इंदापूरकर कोणत्याही आमिषाला बळी न पडता बहुजन मुक्ती पार्टीसोबत येतील असे मखरे यांनी म्हटले.
आम्ही सत्तेत आल्यास लॉकडाऊन काळातील घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्ण माफ करणार असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत आपला स्वतंत्र पॅनल असेल. परंतु सत्तेत सन्मानाने हिस्सेदारी दिल्यास युती शक्य असल्याचे सांगत अॅड. मखरे यांनी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीकडे इशारा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा