मातंग समाजातील लोकांवर भ्याड हल्ला; हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करा - लहुजी शक्ती सेनेची मागणी

तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देताना 

हल्लेखोरांना तात्काळ अटक न केल्यास लहुजी शक्ती सेना छेडणार राज्यभर आंदोलन

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२३ नोव्हेंबर) :- लोणी खुर्द (ता. रिसोड, जि. वाशिम) येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे चित्र असलेला फलक लावण्याच्या कारणावरून मातंग समाजातील महिला, मुले व वृद्धांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी अन्यथा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज (२३ नोव्हेंबर) यासंदर्भात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने इंदापूर येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

लोणी खुर्द येथे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे चित्र असलेला बोर्ड लावण्याच्या कारणास्तव गावातील जातीयवादी मानसिकतेच्या गावगुंडांनी २० नोव्हेंबरच्या सायंकाळी मातंग समाजाच्या वस्तीवर लोखंडी रॉड, कुऱ्हाडी आणि इतर धारदार हत्यारांसह हल्ला चढवत मातंग समाजातील वयोवृद्ध, महिला, पुरुष आणि मुलांना जबर मारहाण केली असून, या भ्याड हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या निंदनीय घटनेचा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने इंदापूर येथे तीव्र निषेध करण्यात आला. सदर घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे. कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही लहुजी शक्ती सेनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

हे देखील वाचा - लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना आणि शिवधर्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंतांना चादरींचे वाटप

निवेदन देतेवेळी, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप, तालुकाध्यक्ष अजित सोनवणे, तानाजी सोनवणे, साजन ढावरे, पप्पु जगताप, अनिल ढावरे, महेश खंडाळे, सुग्रीव साठे, ऋतिक सोनवणे, कालिदास माने, मंथन पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट