बलिप्रतिपदा दिन बळीराजाची पुण्यतिथी म्हणून साजरा व्हावा - बहुजन परिषदेची मागणी
मुत्सुद्देगिरी :- चेतन चव्हाण (संपादक)
निमगाव (६ नोव्हेंबर) :- बहुजनांचा राजा बळी यांचा घातपात करण्यात आला असून, बहुजनांच्या अज्ञानातून साजरा होत असलेल्या पाडव्याचा आनंद टाळून हा दिवस बळीराजाची पुण्यतिथी म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी बहुजन परिषदेने केली. निमगाव येथील सुवर्णगणेश मंदिरात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) बलिप्रतिपदा दिनानिमित्त आयोजित बळीराजाच्या पुण्यतिथी दिनाच्या छोटेखानी कार्यक्रमात ही मागणी करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये बोलताना बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी, बळीराजा या बहुजनांच्या दिलदार, दानशूर व पराक्रमी राजाचा कपटाने खून करण्यात आल्याचे म्हटले. काही लोकांनी खोटी कथा रचून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केल्याने आज बहुजन समाज बळीराजाची पुण्यतिथी नव्हे तर आनंद साजरा करत असल्याचे सांगताना या दिवशी बळी राजांची पुण्यतिथी साजरी केली जावी अशी मागणी लोखंडे यांनी केली.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांनी, रंगनाथन आयोगाचा अहवाल तात्काळ लागू करण्याची आग्रही मागणी केली. तर इंदापूर तालुका स्वाभिमानी विकास मंचाचे अध्यक्ष युवराज अण्णा मस्के, परिवर्तन समितीचे घनश्याम निंबाळकर, प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष संजय राऊत, बहुजन परिषदेचे राज्य सचिव विजयराव गायकवाड, निमगाव केतकी तंटामुक्ती अध्यक्ष अतुल आप्पा मिसाळ, सुवर्ण योगेश्वर पतसंस्थेचे मच्छिंद्र आप्पा चांदणे इत्यादींनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्ताविक ऍड. श्रीकांत करे यांनी, तर किशोर आबा पवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा