इंदापूरमध्ये जाहिरातींचे बॅनर करताहेत राजमुद्रेचा अपमान; प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत

बॅनरमुळे झाकली गेलेली देशाची राजमुद्रा

विना परवानगी बॅनर लावणाऱ्या आणि छापून देणाऱ्यावर कारवाई व्हावी - अॅड. आशुतोष भोसले

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (५ नोव्हेंबर) :- सध्या इंदापूर शहरात जाहिरातींचे बॅनर (होर्डींग्स) लावण्याची स्पर्धा लागली असून, या होर्डींग्समुळे राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान वारंवार होत असूनही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी खासदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने अकलूज चौकात बसवलेल्या राजमुद्रेच्या आजूबाजूला सतत वेगवेगळ्या जाहिरातींचे मोठमोठे बॅनर लावले जात असल्याने या बॅनरमुळे राजमुद्रा पूर्ण झाकली जात असून एकप्रकारे राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान होत असल्याचे अॅड. आशुतोष भोसले यांनी म्हटले आहे.

अशा प्रकारे होर्डिंग्ज लावण्याआधी त्याची कायदेशीर परवानगी पोलीस प्रशासन आणि नगरपरिषदेकडून घेणे, त्याची शासकीय रक्कम अदा करणे आवश्यक असताना या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. स्थानिक प्रशासन मात्र यावर कुठेही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे शासकीय, सार्वजनिक आणि  कोणाच्याही खाजगी जागेत कोणीही, कधीही बॅनर लावताना दिसत आहे. विनापरवानगी असे बॅनर लावणाऱ्यास अथवा असे बॅनर छापून देणाऱ्या संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असूनही स्थानिक प्रशासन कोणावरही कारवाई करण्याची मानसिकता दाखवत नसल्याचे दिसत आहे.

या संदर्भात राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१, कलम २ अन्वये अयोग्य पध्दतीने आणि विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात करणे महत्त्वाचे आहे. याबाबत भोसले यांनी अनेकवेळा इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही केली होती. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कापरे यांनी हे होर्डींग्स विना परवानगी लावण्यात आल्याचे सांगत या तक्रारीची तात्पुरती दखल घेतली खरी, मात्र अद्यापही अवमानाचे प्रकार होत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट