केंद्राच्या चुकीच्या धोरणांविरोधातील काँग्रेसची जनजागरण यात्रा आज इंदापूरात
नगरपालिकेच्या प्रांगणात साडेअकरा वाजता होणार सभा
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२६ नोव्हेंबर) :- केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था उध्वस्त झाली असून, महागाईमुळे त्रस्त जनतेचा आक्रोश केंद्राच्या कानी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान जनजागरण अभियान राबवले जात आहे. हे जनजागरण अभियान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार असून, ही यात्रा आज संविधान दिनी (२६ नोव्हेंबर) इंदापूर शहरामध्ये सकाळी १० वा. ३० मिनिटांच्या सुमारास दाखल होणार असल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी दिली आहे.
भाजप विरोधी सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये केंद्र सरकार राजकीय कुटील हेतूने कृत्रिम भाववाढ करीत असल्याने महाराष्ट्रासह भाजप विरोधी सरकार असलेल्या इतर राज्यांमध्ये महागाईने कळस गाठला आहे. जनता त्रस्त असून, केंद्राच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची सुरू असलेली जनजागरण यात्रा आज काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे निरीक्षक उत्कर्षा रूपवते आणि दादू शेठ खान, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळी यांच्या उपस्थितीत इंदापूर शहरामध्ये साडेदहा वाजता दाखल होणार आहे. संविधान चौक ते मुख्य बाजारपेठ अशी होत ही यात्रा नगरपालिकेच्या प्रांगणात अंदाजे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान पोहोचणार आहे. यावेळी नगरपालिकेच्या प्रांगणात सभा होणार असल्याची माहिती स्वप्नील सावंत यांनी दिली असून, इंदापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वप्नील सावंत यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा