हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका? कारखान्यांचा गाळप परवाना रद्द?
इंदापूर (४ नोव्हेंबर) :- शेतकऱ्यांची ३०० कोटींची एफआरपी थकवल्याच्या कारणास्तव राज्यातील ४३ साखर कारखान्यांचा गाळप परवाना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रोखल्याची बातमी सध्या समोर येत असून, या कारखान्यांमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कर्मयोगी आणि त्यांच्या अखत्यारीत असलेल्या इन्द्रेश्वर कारखान्यांचा समावेश असल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या बातमीत तथ्य असेल तर हा हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का मानावा लागेल. यामध्ये माजी खासदार धनंजय महाडिक, समाधान अवताडे, पंकजा मुंडे, संजय काका पाटील, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कारखान्याचा समावेश असल्याची माहितीही प्रसारमाध्यमांतून समोर येत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे पैसे न दिल्याने परवाने रोखण्यात आले आहेत. एफआरपी दिल्यानंतरच गाळप परवाना देण्यात येणार असल्याचे साखर आयुक्तांनी स्पष्ट केल्याने कारखान्यांचा हंगाम नुकताच सुरू झाला असताना परवाना रोखण्यात आल्याने साखर कारखानदारांना मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील ऊस बिलाचे चेक शेतकऱ्यांना दिले होते. मात्र, चेक बाऊन्स झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे केल्याची चर्चा होती. तर मंगळवारी (२ नोव्हेंबर) कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात हजारो संतप्त शेतकऱ्यांनी काटा बंद पाडला होता. यावेळी करमाळा तालुक्यातील एका ३० वर्षीय युवक शेतकऱ्याने ५ हजारांसाठी आपला बाप मेला पण कारखान्याकडून आपल्याला पैसे मिळाले नाहीत असं सांगत हंबरडा फोडला होता. हा व्हिडीओ अवघ्या महाराष्ट्रात वायरल झाला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा