ऊसतोड कामगारांकडे अवैध शस्त्रसाठा; अचानक छापा टाकून इंदापूर पोलीसांनी केली अटक
समीर सय्यद (उपसंपादक)
शुक्रवार (१८ डिसेंबर) : इंदापूर पोलीसांनी काल रात्री वरकुटे बू।। (आबा करेवस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे) याठिकाणी ऊसतोडणी करण्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर अचानक छापा टाकून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धारदार तलवार, जांबिया कोयते असा अवैध शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा, कलम ४, २५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून या आरोपीवर कर्जत (जि., अहमदनगर) पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तर एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात इंदापूर पोलीसांच्या रडारवर होता.
सविस्तर वृत्त असे की, २३ नोव्हेंबरच्या पहाटे आपल्या २ महिन्यांच्या 'पिला' नावाच्या चिमुकलीचा खून करणारा सकट्या उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ चिंटू विकास काळे (रा. भांबूरे ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा इंदापूर पोलीसांच्या रडारवर होता. या अनुषंगाने काल (१७ डिसेंबर) रात्री अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस नाईक दिपक पालके, पोलीस कॉन्स्टेबल अमित चव्हाण, विनोद मोरे, प्रविण शिंगाडे, विनोद काळे, जगदीश उर्फ मामा चौधर, गजेंद्र बिरलिंगे, विठ्ठल नलवडे, विक्रम जमादार यांनी, वरकुटे बू ।। (आबाकरेवस्ती, ता इंदापूर, जि. पुणे) येथे ऊसतोड करणारे भांबूरे (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथील ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर अचानक छापा टाकला.
हे देखील वाचा - बापानेच केला २ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा खून
या छाप्यामध्ये सकट्या उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ चिटू विकास काळे, नितीन विकास काळे, जितेंद्र भारत चव्हाण, अर्जुन विकास काळे (सर्व रा. भांबूरे ता, कर्जत जि. अहमदनगर) हे मिळून आले. ते झोपलेल्या ठिकाणी अंथूर्णाखाली धारदार तलवार, धारदार जांबिया, धारदार २ कोयते अशी घातक हत्यारे मिळून आली आहेत. याप्रकरणी इंदापूर पोलीसांनी वरील चार आरोपींच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये एकुण ०४ गुन्हे दाखल केले असून, इंदापूर न्यायालयाने या चारही आरोपींना २३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा - कृषी कायदे शेतकरी व संविधान विरोधी
अटक आरोपींनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी काही गुन्हे केले आहेत का? याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. दिपक पालके व प्रमोद धंगेकर करीत आहेत.
हे देखील वाचा - तर काँग्रेस पार्टी इंदापूर नागरपालिकेविरोधात आंदोलन पुकारले
यातील सकट्या उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ चिंटू विकास काळे (रा. भांबूरे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याने २३ नोव्हेंबरच्या पहाटे स्वतःची मुलगी 'पिला' (वय २ महीने) हिचे नाक आणि तोंड दाबून तिला जिवे ठार मारले होते. त्याविरोधात इंदापूर पोलीसांत भा.दं.वि.क, ३०२ अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. तर नितीन विकास काळे हा सराईत गुन्हेगार असून, याच्यावर कर्जत (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा