राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आश्वासनानंतर ६ जानेवारीपर्यंत ऍड. राहुल मखरे यांचे आंदोलन मागे
समीर सय्यद (उपसंपादक)
रविवार (२० डिसेंबर) : इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ असून, भरणे यांच्या पाठबळानेच इंदापूर पोलीस ठाणे सर्व सामान्य नागरिकांसाठी अन्यायाचा अड्डा बनत चालला असल्याच्या गंभीर आरोप ऍड. राहुल मखरे यांनी केला होता. दोषींवर कार्यवाहीसाठी ऍड. मखरे यांनी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. मात्र, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीनेच ऍड. राहुल मखरे यांनी हे आंदोलन ६ जानेवारीपर्यंत स्थगित केले आहे.
ऍड. राहुल मखरे यांनी, इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर आरोप करताना, त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कारणीभूत असल्याचे म्हटले होते. मात्र, अखेर आज दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीनेच ऍड. मखरे यांनी हे आंदोलन ६ जानेवारी पर्यंत मागे घेत असल्याचे सांगितले. परंतु, सोबत दोषींवर योग्य कार्यवाही न केल्यास राज्य स्तरीय आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आज दुपारी राज्यमंत्र्यांनी आंदोलन स्थळाला भेट देत मोबाईलवरून अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्याशी संवाद साधत या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर पोलीस विभागच्या अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या बाबतीत अनेक तक्रारी वरिष्ठांकडे आल्या असल्याचे सांगताना, सदर प्रकरणातील अधिकाऱ्यांची तात्काळ सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले जातील, आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
हे देखील वाचा - बापानेच केला २ महिन्यांच्या चिमुकलीची नाक तोंड दाबून खून
दरम्यान, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनाही राज्यमंत्री भरणे यांनी, सदर प्रकरणाची चौकशी करुन कोणावरही अन्याय केला जाणार नाही, किंबहुना आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती. मात्र, राज्यमंत्र्यांची विनंती धुडकावत, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे संजय सोनवणे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा