बापानेच केला २ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा खून; इंदापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
शुक्रवार (१८ डिसेंबर) : बापानेच आपल्या 'पिला' नावाच्या २ महिन्यांच्या चिमुकलीचा झोपेतच नाक आणि तोंड दाबून खून केल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील करेवाडी या ठिकाणी २३ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वा. सुमारास घडली होती. सकटया उर्फ चिटू उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान काळे (वय १८ वर्षे, रा. भांबूरे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नांव असून, आरोपीच्या पत्नी सोनम यांच्या फिर्यादीवरून आज (१८ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भा.दं.वि.क.३०२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सोनम या गेले दोन महीन्यांपूर्वी त्यांचा नवरा सकट्या उर्फ चिटू उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान विकास काळे (रा. भांबूरे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व त्यांची २ महिन्यांची मुलगी 'पिला' हिच्यासह ऊसतोडीसाठी मालोजी एकनाथ करे (रा. करेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याकडे काम करत होत्या. ते इतर टोळी कामगार यांच्यासह एकनाथ धोंडीबा करे (रा. करेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या मालकिच्या शेतात कोपी करून राहत होते. दिनांक २२/११/२०२० रोजी दिवसभर ऊसतोड करून रात्री ८:०० वा. च्या सुमारास कोपीवर आल्यानंतर फिर्यादी सोनम यांचा नवरा सकट्या काळे याने नेहमीप्रमाणे सोनम यांना "हि मुलगी माझी नाही, तुम्हालाही हुंडा मिळू देणार नाही व मी पण खाणार नाही" आज तु माझे मागे ऊस तोडलेल्या मोळया का बांधायला आली नाही असे म्हणून त्यांच्याशी भांडण काढून, त्यांना लाथाबूक्यांनी मारहाण करत ऊसतोडणीचा धारदार कोयता हातात घेवून त्यांच्या अंगावर धावून येत होता. नवऱ्याने सोनम यांच्याशी भांडण करून मारहाण केल्यामुळे त्या रात्री १०:०० वा. च्या सुमारास जेवन न करताच त्यांच्या लहान मुलीसह झोपी गेल्या.
२३ नोव्हेंबरच्या पहाटे ०५:०० वा. सुमारास सोनम यांच्या अंगाला 'पिला' हिचे पाय लागल्याने त्या झोपेतून जाग्या झाल्या तेव्हा त्यांचा नवरा सकट्या त्याच्या दोन्ही हाताने मुलगी 'पिला'चे नाक व तोंड दाबत होता. त्यावेळी सोनम यांनी कोपीबाहेर येवून मोठमोठयाने सकट्याने पिलाला ठार मारले असा आरडाओरडा केला. तेव्हा कोपीशेजारी इतर ऊसतोड करणारे लोकांनी सकट्याचा पाठलाग केला. परंतू तो अंधारात पळून गेला. त्यानंतर फिर्यादी सोनम व तिच्या नातेवाईकांनी टोळीमालक मालोजी करे यांच्या मदतीने पिकअप भाडेतत्वावर करून भांबूरे येथे गेल्या व आई, वडील आणि भाऊ यांच्यासह पुन्हा इंदापूर पोलीस ठाण्यात आल्या. परंतू फिर्यादी सोनम यांनी घडलेल्या प्रकाराबाबत काहीएक बोलण्याची मानसिकता नसल्याने २३ नोव्हेंबर रोजी केवळ मुलीच्या मयताची खबर दिली होती. व आज दिनांक १७/१२/२०२० रोजी मुलगी मयत झाल्याच्या दुखातुन सावरून इंदापूर पोलीस ठाण्यात येवून त्यांचा नवरा सकट्या उर्फ चिटू उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान विकास काळे याने मुलगी 'पिला' हिचे नाक-तोंड दाबून तिला जिवे ठार मारल्याबाबत फिर्याद दिली.
हे देखील वाचा - सावित्रीबाई फुले जयंतीदिनी इंदापूरमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
इंदापूर पोलीसांनी आरोपी सकट्या काळे याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ३०२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा करून फरार झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून, पकडण्याची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, मा. पोलीस निरीक्षक सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस नाईक दिपक पालके, पोलीस कॉन्स्टेबल अमित चव्हाण, प्रविण शिंगाडे, विनोद काळे, मामा चौधर, गजेंद्र बिरलिंगे, विठ्ठल नलवडे, विकम जमादार, विनोद मोरे यांनी केली आहे. दाखल गुन्हयाचा तपास महीला पोलीस उपनिरीक्षक सिमा मुंडे या करीत आहेत.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा