नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ; डॉ. राऊत आर्थिक अडचणीत

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

बुधवार (२३ डिसेंबर) : १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूर शहरातील राम-सिता डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने डॉ. राऊत यांचे तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. वारंवार पाठपुरावा करूनही आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून मानसिक तणावामुळे आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी जबाबदार असेल असे डॉ. बाळासाहेब राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

इंदापूर शहरात १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूरमधील डॉ. बाळासाहेब राऊत यांचे राम-सिता डायग्नोस्टिक सेंटर पाण्यात बुडाल्याने, सोनोग्राफी मशीन, डिजिटल एक्स-रे मशीन, १०० KV चे UPS, १६ स्लाईसची सिटी स्कॅन मशिन, कम्प्युटर, फर्निचर सर्वकाही कवडीमोल झाले. यामध्ये डॉ. बाळासाहेब राऊत यांचे तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. २० वर्षांपासून विम्याचे हप्ते भरूनही आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी आता नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे.

विम्याच्या नुकसान भरपाईसाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर विमा कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी ८-९ वेळा घटनास्थळी व्हिजिट दिल्या आहेत, ७-८ वेळा मिटींग्स केल्या आहेत, डॉ. राऊत यांनी मेलद्वारे कंपनीशी अनेक वेळा संपर्कही केला, हजार वेळा कॉलही केले, आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही झाली आहे, मात्र, तरीदेखील नुकसान भरपाई देण्यास आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी या ना त्या कारणाने हात वर करू पाहत असल्याचे डॉ. राऊत यांनी सोमवारी (२१ डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पावसाचे पाणी घुसल्याने डायग्नोस्टिक सेंटर मधील खराब झालेल्या मशिन्स
(पावसाचे पाणी घुसल्याने डायग्नोस्टिक सेंटर मधील खराब झालेल्या मशिन्स)



सदर विमा कंपनी खराब झालेली मशीन्स आहे त्या जागेवरून काढायलाही देत नसल्याने जागेअभावी नव्या मशिन्सही दिल्लीत खितपत पडल्या आहेत. मागील ७० दिवसांपासून डायग्नोस्टिक सेंटर पूर्णपणे बंद असल्याने रोज लाखोंचे नुकसान होत आहे ते वेगळेच. कोरोनाच्या निदानासाठी HRCT टेस्टसाठी लागणारी तालुक्यातील एकमेव सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने कोरोना काळातही रुग्णांना अकलूज, बारामती आणि इतर ठिकाणी जावे लागत आहे.

हे देखील वाचा - इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ

बँकेचे थकलेले हप्ते, कामगारांचे पगार यामुळे डोक्यावर कर्जाचा विळखा वाढत चालला असून, मानसिक तणावामुळे आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला सर्वस्वी आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी आणि कंपनीचे पदाधिकारी जबाबदार असतील - डॉ. बाळासाहेब राऊत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट