पो. निरीक्षक सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ - ऍड. राहुल मखरे
![]() |
| (ऍड. राहुल मखरे कार्यकर्त्यांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर उपोषणाच्या ठिकाणी) |
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
इंदापूर (२० डिसेंबर) : इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ असून, भरणे यांच्या पाठबळानेच इंदापूर पोलीस ठाणे सर्व सामान्य नागरिकांसाठी अन्यायाचा अड्डा बनत चालला असल्याच्या गंभीर आरोपांचा पुनरुच्चार बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी काल (१९ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणादरम्यान केला. कांदलगांव येथील बाबर प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे. राजवर्धन पाटील यांनी ऍड. मखरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आंदोलनाच्या ठिकाणी राजकीय लोकांची वर्दळ वाढू लागली आहे. तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सारंगकर यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत कांदलगांव येथील बाबर प्रकरणात आजपासून धरणे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी गुरुवारी (१७ डिसेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत, इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असून, महाराष्ट्राचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वरदहस्ताने ते आपल्या अधिकारांचा गैरवापर करत इंदापूर पोलीस ठाण्याला गुन्हेगारांना वाचवण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्याचा अड्डा बनवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. याआधीही ऍड. मखरे यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर निमगांव येथील फॅबीफ्ल्यू गोळ्या चोरी प्रकरणामध्ये दोषींना वाचवत असल्याचा आरोप केला होता. तर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामांमध्ये सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री असलेले दत्तात्रय भरणे व त्यांच्याशी संबंधित निकटवर्तीय लोकांकडून वारंवार हस्तक्षेप होत असल्याची कुजबुज काही प्रशासकीय कर्मचारी व नागरिकांदरम्यान ऐकायला मिळत आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणे ही आपली राजकीय भूल असल्याचे ऍड. मखरे यांनी सांगताना, अन्यायग्रस्त नागरिक भरणे यांचेच कार्यकर्ते व मतदार असल्याचे म्हटले आहे. तर सारंगकर यांच्यासारखा भ्रष्ट अधिकारी पोलीस खात्यात असणे हे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन करत आहे. दोषींवर कार्यवाहीच्या मागणीसाठी ऍड. मखरे यांनी काल (१९ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला असून, न्याय न मिळाल्यास रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
हे देखील वाचा - ऊसतोड कामगारांकडून अवैध शस्त्रसाठा जप्त; इंदापूर तालुक्यातील घटना
गुरुवारी (१७ डिसेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेला कांदलगांव येथील गणपत बाबर आणि तालुक्यातील असे अनेक नागरिक उपस्थित होते ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नारायण सारंगकर यांच्यावर चुकीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा, बेकायदेशीररित्या जेलमध्ये डांबल्याचा, खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याचा, फिर्यादींनाच खोटे गुन्हे दाखल होण्याचा भीतीने फिर्याद न देण्याची, फिर्यादींची तक्रार न स्वीकारल्याचा आणि महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता. पुराव्यादाखल काही कॉल रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या, तर कांदलगांव येथील सुमन बाबर यांना इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनीच आत्महत्येचा पर्याय सुचवल्याचा व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असणारी सुमन बाबर यांची हस्तलिखित सुसाईड नोटही पत्रकार परिषदेत वाचून दाखवण्यात आली होती.
![]() |
| (विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ऍड. राहुल मखरे यांची उपोषणाच्या ठिकाणी भेट घेतली) |
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माझे कसलेही लागेबांधे नसून, मी वर्दीशी इनाम राखत कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे प्रत्येक बाब हाताळत असल्याचा खुलासा करत ऍड. मखरे यांनी लावलेल्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिले असले तरी, हा वाद निवळण्याऐवजी राजकीय दृष्टिकोनातून भलताच चघळला जाणार असल्याचे दिसत आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे राजकीय विरोधक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी ऍड. मखरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर भाजप पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे आणि इंदापूर नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम यांनी देखील आंदोलनाच्या ठिकाणी ऍड. मखरे यांची भेट घेतली.
![]() |
| (संजय सोनवणे, अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) पश्चिम महाराष्ट्र) |



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा