अंकिता पाटील यांना सत्यजित तांबे यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही - तानाजीराव भोंग

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

रविवार (२७ डिसेंबर) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काल (२६ डिसेंबर) इंदापूर येथे आयोजित युवक मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता शंकरराव पाटील यांची विचारधारा संधीसाधूपणाच्या वृत्तीमुळे सोडल्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी सत्यजित तांबे यांना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये असा टोला लगावला आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर देखील पलटवार करताना इंदापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी, अंकिता पाटील यांना सत्यजित तांबे यांच्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

काल (२६ डिसेंबर) इंदापूर शहरातील नामदेव मंदिरामध्ये युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर शंकरराव पाटील यांची विचारधारा सोडल्याचा आरोप केला होता. याचे कारण संधिसाधूपणा असल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपावर पलटवार करताना हर्षवर्धन पाटील यांची कन्या व काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी सत्यजित तांबे यांना तुमचा संधिसाधू राजकारण सर्वांना माहीत आहे, त्यामुळे तुम्ही लहान तोंडी मोठा घास घेऊ नये असा टोला आज लगावला आहे. जेवढा हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय अनुभव आहे तेवढे तुमचे वय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी कोणी सहकार्य केले, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवणे आवश्यक होते. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासंदर्भात बोलताना सत्यजित तांबे यांनी राजकीय संकेत बाळगणे आवश्यक होते, असे मतही अंकिता पाटील यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा - कोरोना काळातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाची मोठी समस्या

आता अंकिता पाटील यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी अंकिता पाटील यांना सत्यजित तांबे यांच्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. सत्यजित तांबे यांचा जन्मच काँग्रेस विचारांच्या घराण्यात झाला असून, ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. अंकिता पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये निवडून येऊनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला असल्याचा आरोपही तानाजीराव भोंग यांनी केला आहे. अंकिता पाटील यांनी आधी काँग्रेस पक्ष आणि पदाचा राजीनामा द्यावा आणि मगच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करावेत, असा सल्लाही तानाजीराव भोंग यांनी अंकिता पाटील यांना दिला आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध पाटील असा वाद आणखी चिघळण्याची शक्यता दिसत आहे.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट