तर इंदापूर शहर काँग्रेस कमिटी नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडेले

मुख्याधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी





चेतन चव्हाण (संपादक)

बुधवार (२२ ऑक्टोबर) : इंदापूर शहरातील राजेवलीनगर, शेंडेमळा, शाहूनगर, जावईवाडी भागातील गटारी आणि रस्त्यांच्या संदर्भात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आणि बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील रहिवाश्यांच्या घरात पाऊसाचे व गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. वरील समस्यांमुळे या भागांतील लोकवस्तीमध्ये आता रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सदर परिसराशी निगडित विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी इंदापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना काल निवेदन देण्यात आले. 

बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते, ज्याला या भागातील अनेक तक्रारी नंतरही न सोडवण्यात आलेली ड्रेनेजची समस्या कारणीभूत असल्याचा ठपका काँग्रेस कमिटीने काल दिलेल्या निवेदनात ठेवला आहे. तर इंदापूर शहरात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीच्या अनेक कारणांपैकी बऱ्याच अंशी राजेवलीनगर मधील ड्रेनेजची न सोडवण्यात आलेली समस्या देखील कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या भागांतील रस्त्यांच्या समस्येकडेही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात स्पष्ट करताना, या भागातील रस्त्यांच्या संदर्भात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या शहरात घाई गडबडीत केलेल्या कामांचा हवाला देत सदर भागात निकृष्ट दर्जाचा का असेना मात्र रस्ता का करण्यात आला नाही, व भविष्यात कधी होईल असा दुधारी सवाल नगरपालिका प्रशासनाला करण्यात आला आहे.

या भागांमधील नागरी वस्त्यांसंदर्भात दुर्लक्षित असलेल्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या नाही तर भविष्यात इंदापूर शहर काँग्रेस कमिटी नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी इंदापूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तानाजी भोंग, जकिरभाई काझी, चमनभाई बागवान, तुषार चिंचकर, बिभिषण लोखंडे, संतोष शेंडे, निवास शेळके, मिलिंद साबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

२०१६ पासून इंदापूर नगरपालिकेवर अधिकृतपणे काँग्रेस पक्षाचीच मात्र हर्षवर्धन पाटील गटाची सत्ता असल्याचे बोलले जाते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या गटाने विधानसभा निवडणूकीसाठी हर्षवर्धन पाटील यांचा प्रचार केला होता. या पक्ष विरोधी भूमिकेमुळे आजतागायत ना काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, ना कोणत्याही नगरसेवक वा पदाधिकाऱ्याने पक्ष सोडल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्यातरी काँग्रेसने काँग्रेसलाच इशारा दिल्याची ही अजब घटना म्हणावी लागेल. तर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या तळ्यात मळ्यातल्या या भूमिकेमुळेच शहरातील विकास कामांना खीळ बसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट