इंदापूर शहरातील बाबा चौकात अपघात; अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू, तर दोघे जण जखमी
समीर सय्यद (उप संपादक)
रविवार (११ ऑक्टोबर) : इंदापूर शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर हायवेवर बाबा चौकात दूध वाहतूक करणाऱ्या टँकरची धडक बसल्याने अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज (११ ऑक्टोबर) दुपारी सव्वाएकच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण इंदापूर शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. टँकर चालकाला अटक करण्यात आली असून विविध कलमान्वये त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा - आगीत बेडशिंग येथील शेतकऱ्याचे घर भस्मसात; मदतीची गरज
सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी सव्वाएकच्या सुमारास गौरव प्रकाश मिसाळ व अश्विनी ज्ञानेश्वर साठे हे बाबा चौकातील एका खाजगी रुग्णालयात लहान बाळाला उपचारासाठी घेऊन गेले होते. उपचार झाल्यानंतर ते आपल्या एमएच-४२-एझेड-२५५८ या स्कुटी वरुन बाबा चौकातून घराच्या दिशेने राज कोल्ड्रिंक्स आणि सोडा शॉपी जवळ आले असता मागून भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने निघालेल्या नेचर डिलाईट कंपनीच्या दूध टँकरने स्कुटीस जोरदार धडक दिली व पळून जाण्याचा उद्देशाने अंदाजे शंभरफुटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेत आदित्य ज्ञानेश्वर साठे (वय अडीच वर्ष, मुळगाव बावडा ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या राहणार चाळीसफुटी इंदापूर, जि. पुणे) या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गौरव प्रकाश मिसाळ व अश्विनी ज्ञानेश्वर साठे हे जखमी झाले आहेत. टँकर चालक वैभव दत्तात्रय डोके (रा. कण्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यास अटक करण्यात आली असून, त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३०४, ३३७, ३३८, २७९, ४२७ आणि भारतीय दंड संहिता १९८८ च्या कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इंदापूर शहरातील बाबा चौकापासून हाकेच्या अंतरावरच इंदापूर पोलिस ठाणे, उपजिल्हा रुग्णालय, महावितरण, शैक्षणिक संस्था व अनेक खाजगी रुग्णालये, आणि महत्वाची शासकीय कार्यालये असल्याने या चौकात कायम वर्दळ, बेशिस्त पार्किंग, वाहनांची गर्दी, व वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते. असे असताना देखील अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सरडेवाडी टोलनाक्यानजीक दिवसा दुचाकी, तर रात्री अपरात्री अवजड वाहनांच्या कागदपत्रांची तपासणीकरीता नित्य नियमाने कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस शिपाई आणि होमगार्ड कर्मचाऱ्यांपैकी काही जणांची नियुक्ती बाबा चौकात वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी करावी अशी मागणीयुक्त कुजबुज नागरिकांमध्ये आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा