हाथरस येथील दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी द्या - स्वाभिमानी चर्मकार महासंघाची मागणी


समीर सय्यद

इंदापूर (४ ऑक्टोबर) : माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत उमटताना दिसत आहेत. या प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी इंदापूर येथे स्वाभिमानी चर्मकार महासंघाने केली आहे. अशा मागणीचे लेखी निवेदन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना देण्यात आले.

१४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा गावातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. काल (३ ऑक्टोबर) इंदापूर येथील गेस्ट हाऊस या ठिकाणी कोरोना संदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी स्वाभिमानी चर्मकार महासंघाच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात देशात दलित समाजावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असताना देखील शासन कोणतेही कठोर पाऊले उचलताना दिसत नसल्याचे नमूद करताना, अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष व चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, माथाडी कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दुर्वास शेवाळे, चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णा हराळे, प्रदेश उपाध्यक्ष राजू शेवाळे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पांचगणे, युवा तालुका अध्यक्ष नवनाथ सोनवणे, युवा तालुका उपाध्यक्ष गणेश कांबळे, सचिव पांडुरंग ढमढेरे, इंदापूर शहराध्यक्ष बाळू लांडगे, इंदापूर शहर उपाध्यक्ष सुहास शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते विजय शेवाळे व सुनील कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संतोष लोंढे, आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट