इंदापूर पोलीसांचा विना मास्क फिरणाऱ्यांना दंडात्मक धक्का योग्यच

विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करताना इंदापूर पोलीस

१३ जणांवर दंडात्मक कारवाई; ६५०० दंड वसूल

इंदापूर पोलीसांनी विना मास्क फिरणाऱ्यांना दंडात्मक धक्का दिला असून, तालुक्यातील दारू, जुगाराच्या अड्डयांवर छापे व वाळू तस्करांवर तडीपाराच्या कारवाई पाठोपाठ कोरोना संसर्गाबाबत निष्काळजीपणे वागत असलेल्या व विना मास्क फिरणाऱ्या इंदापूर शहरातील नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने विना मास्क फिरणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. अनेक दिवसांपासून प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याचे पाहून नागरिकही बिनधात होते. मात्र कोरोनाचा आलेख पुन्हा वाढू लागल्याने इंदापूर पोलीसांनी केलेली दंडात्मक कारवाई योग्यच होती असे म्हणावे लागेल.

आज (१ सप्टेंबर) दुपारी अचानक पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक देठे, पोलीस हवालदार प्रवीण भोईटे, पोलीस नाईक झरेकर, पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस शिपाई अर्जुन नरळे, पोलीस शिपाई सुहास आरणे, पोलीस शिपाई विक्रम जामदार, पोलीस शिपाई केसकर आणि वाहन चालक जाधव यांच्या पथकाने इंदापूर शहरातील बाबा चौकात विना मास्क फिरणाऱ्या १३ जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ६,५०० रुपयांचा दंड वसूल केला.

हे देखील वाचा - जखमी रुग्णासाठी डॉक्टरांचा नव्हे तर इंदापूर पोलीसांचा जीव तळमळताना मी पाहिलं

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी २८ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची, तर बुधवारी (१ सप्टेंबर) रोजी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी संभाव्य गर्दी व त्यामुळे होणारा कोरोना वाढीचा धोका टाळण्यासंदर्भात या बैठकीत विचारविनिमय व मार्गदर्शन करण्यात आले होते. कोरोना संदर्भात शासकीय नियमांना हलक्यात घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई यापुढेही सुरूच राहील असा इशारा इंदापूर पोलीसांकडून देण्यात आला आहे.

इंदापूर पोलीसांनी केलेली कारवाई योग्यच

इंदापूर तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढू लागला असून, ऑगस्ट महिन्यात तालुक्यात १४२५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये शहरातील १५३ रुग्णांचा देखील समावेश आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा (१२२८) दिलासा देणारा असला तरी, शहरातील एका रुग्णासह तालुका व तालुक्याबाहेरील एकूण ५३ कोरोना रुग्णांचा झालेला मृत्यू प्रशासनाच्या चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे इंदापूर पोलीसांनी केलेली ही कारवाई योग्य होती असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट