इंदापूरचा इतिहास जाणून घेण्यासाठी फायदेशीर ठरणार ' माझ्या शाळेच्या आठवणी' हे पुस्तक

हर्षवर्धन पाटील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करता प्रसंगी

मालोजीराजेंचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूर शहरातील हिंदू मुस्लिम आणि एकूणच सामाजिक एकोप्याचा महत्वाचा धागा मानले जाणारे सेवानिवृत्त शिक्षक महादेव चव्हाण यांनी लिहिलेले 'माझ्या शाळेच्या आठवणी' या आत्मचरित्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी प्रकाशन करण्यात आले. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्यासह इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्तेदेखील या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत असून, याआधीही महादेव चव्हाण यांचे 'देवमय' हे काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले होते. ग्रामीण बोलीभाषेतील 'देवमय' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर २०२० रोजी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांची अजूनही काही पुस्तके प्रकाशनाधीन आहेत, ज्यामध्ये 'ईर्षा' (ग्रामीण कथासंग्रह), 'जावे त्यांच्या गावा' (प्रवासवर्णन) आणि 'रानमाळ' या कादंबरीचा समावेश आहे.


प्रकाशनाप्रसंगी पुस्तकाचे लेखक महादेव चव्हाण यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी, असा शिक्षक गुरू म्हणून ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले असेल. सरांनी विद्यार्थी आणि संस्थेला केंद्रबिंदू मानून घालवलेले अद्यापणाचे क्षण सेवानिवृत्त झाल्याने आज संपले असले तरी आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी लाख मोलाची शिदोरी तरुणांना दिली. 
लोकांच्या स्मरणातून पुसट झालेला इंदापूर तालुक्याचा इतिहास या आत्मचरित्राच्या माध्यमातून त्यांनी पुढे आणल्याचेही पाटील यांनी म्हटले. तर पद्माताई भोसले यांनी, "एका सेवानिवृत्त शिक्षकाने या आत्मचरित्राच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक इतिहासाची तसेच शंकरराव पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील राजकीय व सामाजिक कार्याची ओळख या आत्मचरित्राच्या माध्यमातून इंदापूरकरांना करून दिल्याचे म्हटले.


वडिलोपार्जित संपत्तीचा टेका आणि शिक्षणाचा कौटुंबिक वारसा नसताना व सभोवतालचे वातावरण पूरक नसताना स्वयंस्फूर्तीने यशस्वी जीवनाच्या शिखरावर पोहोचताना आयुष्यात करावे लागलेले अपार कष्ट, दरम्यान आलेले चांगले वाईट अनुभव या पुस्तकात नमूद करतानाच त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला आपले विचार माझ्या 'बा' स समर्पण या काव्यातून आपल्या वडिलांना अर्पण केले आहेत. तर, पिढ्यान पिढ्याचे दारिद्र्य संपवण्यासाठी शिक्षणच एकमेव मार्ग असल्याचा आईचा उपदेश आणि शेण काढता काढता आईने आपल्या हातात दिलेली जीवनाला कलाटणी देणारी पाटी व पेन्सिल हा हृदयस्पर्शी क्षणही त्यांनी उत्तमरीत्या नमूद केला आहे.


या आत्मचरित्रामध्ये चव्हाण सरांनी, इंदापूर तालुक्याचा इतिहास मांडताना पुरातन पळसनाथचे मंदिर, नरसिंगपूर मंदिर, पक्षांचे माहेरघर असलेले भादलवाडी, तालुक्यातील युवकांना रोजगार देणारी भिगवण येथील बिल्ट कंपनी आणि वालचंद इंडस्ट्रीजचा प्रामुख्याने उल्लेख केला असून, विशेषतः आपली जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या इंदापूर शहराचा मध्य व स्वतःची जडणघडण जिथून झाली त्या हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कसब्याचा इतिहास रेखाटताना त्यांनी कसब्यातील वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी व अठरा पगड जातींमध्ये असलेले स्नेहसंबंध, सामाजिक सलोखा आणि त्यांच्या व्यवसायासंबंधी निरीक्षणात्मक वर्णन खूप सुरेख पध्दतीने वर्णीत केले आहेत. सोबतच त्यांनी चिकित्सकपणे 'अरे माणसा, तू माणसात राहिला नाही' या ओळींत नमूद केलेला कसबा परिसरातील लोकांच्या स्वभावात झालेला बदलही नमूद केला आहे.


अस्तित्व हरपत चाललेली व धोकादायक बनलेली ऐतिहासिक राम वेस, वेशीलगतचे हेमाडपंथी राम मंदिर, मालोजीराजेंची दुर्लक्षित गढी, या गढीशेजारी असणारी चांदतारा मस्जिद, कसब्यात साजरी होणारी मुहर्रम, अनेक ऐतिहासिक गुपितं आणि रहस्यांची साक्षी असलेल्या जुमा मस्जिदशेजारीच 'मालोजीराजेंच्या पादुकास्थित असलेले ग्रामदैवत इन्द्रेश्वराचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, आपल्या शैक्षणिक मेहनतीची साक्षी काळी (आलमगीर) मस्जिद, पुरातन चाँदशहावली दर्ग्याच्या इतिहास आणि गांधीवादी विचारसरणीचे शंकर जावडेकर यांची जीवनी उत्तम पध्दतीने मांडली आहे.


एकूणच इंदापूर तालुक्याचा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय इतिहास जाणून घेण्यासाठी हे पुस्तक इंदापूरकरांसाठी फायदेशीर ठरणार आहे. ३०० रु. किंमत असलेले २७२ पृष्ठांचे हे पुस्तक स्नेहवर्धन प्रकाशन (पुणे) यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट