इंदापूर पोलीसांची ५६ वाहनांवर कारवाई; शहरातील अतिक्रमणेदेखील हटवली जाणार

वाहनांवर कारवाई करताना इंदापूर पोलीस

संपादकीय

नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर इंदापूर पोलीसांनी बुधवारी (१ सप्टेंबर) दंडात्मक कारवाई केली. पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीसांच्या पथकाने या कारवाईमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील नोपार्किंग झोनमध्ये असलेल्या जवळपास ५६ वाहनांवर कारवाई करून १२ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. इंदापूर पोलीसांनी केलेली ही कारवाई अनेकार्थी महत्वाची असून, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी बुधवारी (१ सप्टेंबर) व्यापाऱ्यांच्या बैठकीत मांडलेली भूमिका देखील अतिशय महत्वाची व स्वागतार्ह आहे. त्यांनी शहरातील वाहतुकीसाठी अडथळा व अपघातांना कारणीभूत ठरत असलेली शहर व हायवेवरील अतिक्रमणे हटवण्याची भूमिका मांडताना महसूल विभागासह नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाला तयारी दाखवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे अधिकारी तहसीलदारांची ही भूमिका प्रत्यक्षात अमलात आणण्याची मानसिकता दाखवत तहसीलदारांच्या हाकेला ओ देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंदापूर शहराला अतिक्रमणांचा विळखा असून, खासकरून हायवेवरील अतिक्रमणे धोकादायक व अपघातास कारणीभूत ठरत आहेत. फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असताना नगरपरिषद प्रशासन मात्र त्यांच्याकडून कर वसूल करत असल्याची चर्चा आहे. तर अनेकांची फुटपाथवरील जागा व बांधलेले शेड परप्रांतीयांना ३-५ हजार रुपये महिना भाड्याने देऊन चांगलीच कमाई सुरू आहे. पंचायत समितीचा गुरुवारचा "'नो वेहीकल डे' देखील हायवेवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असल्याची बाब तहसीलदारांना माहीत असणे महत्त्वाचे आहे.

या समस्यांचे निवारण होणेही तितकेच महत्वाचे

संविधान चौक ते आय कॉलेज दरम्यान अनेक महत्वाची शासकीय कार्यालये, स्कूल, कॉलेज, बँका आणि बसस्थानक असल्याने वाहने व नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. वाहतुकीची कोंडी इथे रोजचीच. केवळ अतिक्रमणच नव्हे तर अपघाताला आमंत्रण देत शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनांवर आणि कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असताना धोकादायक पध्दतीने ऊसवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्स व बेकायदेशीर बजाटवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. हायवेवर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बनवणे देखील गरजेचे असून, या समस्यांकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच ११ ऑक्टोबरला बाबा चौकात आदित्य साठे या अडीच वर्षाच्या बालकाला भरधाव ट्रकने चिरडल्याने नाहक जीव गमवावा लागला होता.

कौन सीखा है सिर्फ बातों से, यहाँ सबको हादसों की जरूरत है

वरील सर्व बाबींना प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. ते म्हणतात ना, 'आगीशिवाय धूर निघत नाही' म्हणून.  नो पार्किंगच्या वाहनांवर पोलीसांनी पहिल्यांदाच कारवाई करण्याची दाखवलेली मानसिकता आणि बोले तैसा चाले अशी ओळख असलेल्या श्रीकांत पाटील यांनी अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मांडलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह आहे. अतिक्रमण आणि वरील सर्व समस्यांशी निगडित संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या हाकेला ओ देत अजून एखादा अपघात होण्याआधी  कारवाईची मानसिकता आणि धाडस दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा, "कौन सीखा है सिर्फ बातों से, यहाँ सबको हादसों की जरूरत हैही गोष्ट खरी ठरेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट