७ तासात चोरीचा माल ताब्यात; इंदापूर पोलीसांनो तुमची चर्चा साऱ्या गावात

हस्तगत केलेल्या चोरीच्या कंटेनरसह इंदापूर पोलीस

इंदापूर (१८ सप्टेंबर) :- इंदापूर पोलीस तत्पर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, अपघात झाल्याचा बनाव करत बिल्ट कंपनी (भिगवण, ता. इंदापूर, जि. पुणे) जवळून चौघा जणांनी पळवलेला टाटा कंपनीचा कंटेनर (MH-04-EY-9054) आणि त्यातील ११ लाखांचे लोणचे मसाल्याचे २०० बॉक्स असा एकूण १५ लाख रुपयांचा चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून इंदापूर पोलीसांनी अवघ्या ७ तासांत गुन्ह्याचा छडा लावला आहे. ट्रक चालक चंद्रकांत तुळशीराम कांबळे (रा. मिरजापूर, ता. बसवकल्याण, जि. बिदर) यांनी कंटेनर पळवलेल्या चौघांविरोधात शनिवारच्या (१८ सप्टेंबर) मध्यरात्री इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या अनुषंगाने इंदापूर पोलीसांनी तत्पर हालचाली केल्या होत्या.

महाशक्ती लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरमधून ११ लाख रु. किंमतीचे लोणचे मसाल्याचे २०० बॉक्स घेऊन १४ सप्टेंबर रोजी विजयवाडा येथून मुंबई येथील न्हावाशेवा बंदराकडे निघालेल्या या कंटेनरचा चालक चंद्रकांत कांबळे यांनी उजनी ब्रिज पास केल्यावर आपल्या प्रशांत नामी भाच्याच्या श्रीनिवास चांदे नामी मित्राला कंटेनर चालवण्यास देऊन स्वतः मागे जाऊन झोपले. दरम्यान, भिगवण येथील बिल्ट कंपनीपाशी आल्यानंतर कंटेनर थांबवून चंद्रकांत कांबळे यांना सरडेवाडी टोलनाक्याजवळ अपघात झाल्याचे कारण देत कंटेनरचा मागील दरवाजा चेक करण्यास सांगून श्रीनिवास चांदे, भाचा प्रशांत, अन्य एक मित्र आणि सरडेवाडी टोलनाक्याजवळ चढलेला आणखी एक जण अशा चौघांनी कंटेनर घेऊन पळाल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले होते.

या अनुषंगाने इंदापूर पोलीसांनी तत्पर हालचाली करत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि पोलीस उपनिरीक्षक लिगाडे अशा ३ पथकांच्या माध्यमातून सरडेवाडी टोलनाका ते पाटस टोलनाका दरम्यान संशयित वाहने, सर्व ढाबे, हॉटेल्स आणि पेट्रोलपंपावरील CCTV तपासून अखेर रावणगाव (ता. दौंड) येथे हा कंटेनर संपूर्ण मुद्देमालासह अवघ्या ७ तासांत हस्तगत केला. या घटनेतील सर्व आरोपी अद्याप फरार असून, मुंबईतील ट्रान्सपोर्ट कंपनी अथवा अन्य कोणी या गुन्ह्यात सामील आहे का याचा सखोल तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे, सफी सतिश ढवळे, पोलीस नाईक मोहिते, पोलीस नाईक  मोहम्मदअली मड्डी, पोलीस नाईक खान, पोलीस नाईक गाढवे, पोलीस कॉन्स्टेबल मुटेकर, पोलीस कॉन्स्टेबल यादव, पोलीस कॉन्स्टेबल गोसावी यांनी पार पाडली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट