चोरांचा पाठलाग - इंदापूर पोलीसांची तत्परता आणि तिघा युवकांचे धाडस व्वा ! कमालच
![]() |
| पो.ना. मोहम्मद अली मड्डी, कॉ. अमोल खाडे आणि कॉ. यादव, ओम कदम, विशाल पांडे आणि रविराज काळे |
सर्वकाही घडून गेल्यानंतर पोलीसांची एन्ट्री होते ही चित्रपटांतील पोलीसांची प्रतिमा इंदापूर पोलीसांनी खोटी असल्याचे सिद्ध केले असून, बोराटवाडी (ता. इंदापूर) येथे संशयित चोरांना पकडण्यासाठी इंदापूर पोलीसांनी दाखवलेली तत्परता आणि तब्बल ५ किलोमीटर पर्यंत नदीकडेने, उसाच्या शेतातून केलेला चोरट्यांचा पाठलाग कमालीचा होता. ९ सप्टेंबरच्या रात्री घडलेल्या चोरीच्या दोन घटनानंतर बोराटवाडी येथील तिघा धाडसी युवकांनी दुचाकीवर आलेल्या संशयित चोरांचा काळे वस्ती ते बोराटवाडी असा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, संशयित चोर पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी, या तिघा युवकांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि इंदापूर पोलीसांनी तातडीने केलेल्या हालचालींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांपूर्वी (९ सप्टेंबर) मध्यरात्री रेडा आणि रेडणीमध्ये चोरी झाली होती. पैकी रेडा गावातील चोरीचा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झाला होता, ज्यामध्ये तीन चोरटे चोरी करत असल्याचे दिसले होते. दरम्यान, ओम कदम, विशाल पांडे आणि रविराज काळे या तिघा युवकांना एका बजाज कंपनीच्या लाल काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवर (MH-12-SJ-3668) जात असलेल्या अनोळखी तिघा जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ओम कदम आणि त्याच्या दोघा मित्रांनी या संशयितांचा काळे वस्ती ते बोराटवाडीच्या एका मेडिकलपर्यंत पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्याने संशयित चोरांनी त्याठिकाणाहून तात्काळ धूम ठोकली.
👆 चोरी करताना CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले चोर
दरम्यान, पुढे संशयित चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरांकडे शस्त्रास्त्र असल्याच्या भीतीने तिघा युवकांनी इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे यांनी तातडीने हालचाली करत पोलीसांना घटनास्थळी पाठवले. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, कॉन्स्टेबल अमोल खाडे आणि कॉन्स्टेबल यादव त्वरित युवकांनी दिलेल्या माहितीआधारे घटनास्थळी पोहोचले. पोलीस, उंबरगाव आणि बोराटवाडी येथील जवळपास ४० नागरिकांनी नदीकडेने, कच्च्या रस्त्याने, उसाच्या शेतातून असे जवळपास ५ किलोमीटर संशयितांचा शोध घेतला. मात्र संशयित चोर चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. इंदापूर पोलीसांनी अधिक तपास केला असता सदरची गाडी पुण्यातून चोरी झाल्याचे पोलीसांनी सांगितले असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे आणि तिघा पोलीसांनी केलेल्या तत्पर मदतीचे नागरिकांनी आभार मानले असून, इंदापूर पोलीस सत्कारास आणि कौतुकास पात्र असल्याचे म्हटले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे यांच्यासह पोलीसांनी आपला जीव धोक्यात घालून (११ ऑगस्ट) डिझेल चोरांचा पाठलाग करत ट्रक पकडला होता. तर २७ ऑगस्ट रोजी अपघातातील जखमी युवकाचे प्राण इंदापूर पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेनेच वाचले होते. पलायनाच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी अकलूज चौकात ११ नोव्हेंबर रोजी बड्या शिताफीने पकडले होते. तर पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी यांनी देखील इंदापूर शहरात पाठलाग करत एका गुन्हेगाराला पकडले होते. या घटना नक्कीच इंदापूर पोलीसांच्या प्रतिमा उंचावणाऱ्या आणि सामन्यांत पोलीसांबाबत विश्वास निर्माण करणाऱ्या आहेत.

खरंच, इंदापूर पोलिस कौतुकास पात्र आहेत आणि चोरांचा पाठलाग करणारे नागरीक पण कौतुकास पात्र आहेत।
उत्तर द्याहटवाधाडस केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.
उत्तर द्याहटवासर्व कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी व धाडसी युवकांचे विशेष अभिनंदन!
उत्तर द्याहटवाGood work by police and citizens
उत्तर द्याहटवाGood work👍
उत्तर द्याहटवाGood work police & citizen
उत्तर द्याहटवासर्वांचे धाडस खरच कौतुकास्पद आहे सलाम त्यांच्या धाडसाला
उत्तर द्याहटवा