गांजा तस्करी करणाऱ्या २१ वर्षीय युवकाला अटक; एकजण फरार

अटक केलेल्या युवकासह भिगवण पोलीस

भिगवण (२० सप्टेंबर) :- गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीआधारे काल (१९ सप्टेंबर) भिगवण पोलीसांनी गांजा तस्करी करणाऱ्या अशोक शिवदास पवार (रा. वांगी, ता. भूम) या २१ वर्षीय युवकाला दुपारी २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास जुन्या भिगवण राशीन रोडवरून अटक केली आहे. या युवकावर एनडीपीएस कायद्यांतर्गत भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून १६ किलो गांजा आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल भिगवण पोलीसांनी हस्तगत केला आहे. पोलीसांनी सापळा रचल्याची चाहूल लागताच दोघा तस्करांपैकी एकजण मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांनी त्वरित हालचाली केल्याने हा गांजा तस्कर युवक पोलीसांच्या सापळ्यात अडकला. दुचाकीवर पांढऱ्या गोनीमध्ये गांजा घेऊन निघालेल्या दोघा तस्करांना पोलीसांनी थांबण्याचा इशारा करताच पोलीसांनी सापळा रचल्याचा अंदाज आल्याने एकजण पळून गेला.

हे देखील वाचा - चोरीचा माल ७ तासांत इंदापूर पोलीसांच्या ताब्यात

सदरच्या कारवाईमध्ये भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार साईराम भिसे, नवनाथ भागवत, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, आप्पा भांडवलकर, होमगार्ड धुमाळ आणि सुर्यवंशी हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

गांजाशी संलग्न इंदापूर तालुक्यातील याआधीच्या कारवाया

खोरोची (ता. इंदापूर) गावामध्ये उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याने (२७ जून २०२०) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. २१ जुलै रोजी पुणे ग्रामीणचे दहशतवादी पथक आणि इंदापूर पोलीसांनी इंदापूर बायपासवर तब्बल साडेसहा लाखांचा ३२ किलो गांजा जप्त करत दोघांना अटक केली होती. २० सप्टेंबरला गुन्हे अन्वेषण विभाग व वालचंदनगर पोलीसांनी तीन लाखांचा २५ किलो गांजा पकडून ५ जणांवर गुन्हा दाखल केला होता. तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट तसेच पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांच्या नेतृत्वात ७ नोव्हेंबर २०२० ला पुणे ग्रामीण पोलीसांनी भिगवण येथे २४ लाखांचा जवळपास १५० किलो गांजा पकडला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट