खुळे चौक सुशोभीकरण वादाच्या भोवऱ्यात; सार्वजनिक बांधकाम विभाग बेकायदेशीररित्या व अनाधिकाराने अतिक्रमण, खोदकाम आणि डांबरीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप

रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या

इंदापूर (२४ सप्टेंबर) :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून इंदापूर शहरातील खुळे चौकामध्ये प्रस्तावित सुशोभीकरणाचे काम सुरू होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, रियाज निसार शेख (राजेवलीनगर, इंदापूर) यांनी, आपल्या स.स.नं. २१६/११/अ या मिळकतीमध्ये कोणतीही सूचना न देता व कोणत्याही मोबदल्याची भाषा न करता सार्वजनिक बांधकाम विभाग बेकायदेशीररित्या व अनाधिकाराने अतिक्रमण, खोदकाम आणि डांबरीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाला वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या आरोपांबाबत १५ दिवसांत खुलासा देण्याचे आणि सुशोभीकरणाचे काम त्वरित थांबवण्याचे, व न थांबवल्यास दिवाणी व फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची कायदेशीर समज सार्वजनिक बांधकाम विभागाला या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने याआधीही अकलूज लिंकरोडकरिता आपली खुळे चौकातील मोक्याची अडीच गुंठे जागा कोणतीही पूर्वसूचना न देता, विनामोबदला रस्ता रुंदीकरणासाठी बेकायदेशीरपणे वापरली असल्याचा आरोप रियाज शेख यांनी केला आहे. वारंवार तक्रार करूनही सदर विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्याला दाद देत नसल्याचेही शेख यांनी म्हटले असून, रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी आपले किती क्षेत्र संपादित केले? कोणत्या आधारे केले? याचाही खुलासा सदर विभागाने करावा असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. याआधीही शेख कुटुंबीयांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्यावर अन्याय करत असल्याची व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली होती.

रस्त्यात ठेवलेल्या गोण्या अपघाताला निमंत्रण

खुळे चौक आणि अकलूज चौकात सुशोभीकरणाचे काम अपघाताला निमंत्रण देणारे ठरत असून, याकामी प्रस्तावित जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्किंग करून त्याठिकाणी खडी भरलेल्या सिमेंटच्या गोण्या गेल्या अनेक आठवड्यांपासून ठेवल्या आहेत. मात्र, रस्त्यांच्या मध्येच अनाकलनीय पद्धतीने ठेवलेल्या या गोण्यांमुळे अनेक वाहनधारक वाहन चालवताना संभ्रमित होत आहेत. तर रात्री अपरात्री काही वाहने या गोण्यांवर चढल्याने अपघात होता होता बचावले असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या या गोण्या हे काम एखाद्याच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. विशेष म्हणजे अकलूज चौकाच्या मधोमध सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१९ मध्ये राजमुद्रा बसवलेली असतानाही त्याच्याच पुढे आता अजून काय बसवले जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट