ठेकेदाराने मनमानी पद्धतीने केलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका नागरिकांना; कामाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी

पावसाचे व गटारीचे पाणी पांधारानाला परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले.

इंदापूर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार आणि मापात पाप झाल्याच्या अनेक घटना मागे उघडकीस आल्या होत्या. तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांनी रस्त्याची कामे बंद पाडली होती. ठेकेदाराच्या अशाच मनमानी आणि भ्रष्ट पध्दतीने केलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका पांधारानाला परिसरातील नागरिकांनाही बसू लागलाय. राष्ट्रवादीच्या माध्यमातून पांधारानाला परिसरातील इन्द्रेश्वर मंदिर ते कुंभारवाडा आणि रोहिदास गल्लीतील संतोष शेवाळे घर ते सोनवणे गुरुजी घर या ठिकाणी काँक्रीटचे रस्ते नुकतेच बनवण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांच्या विरोधानंतरही ठेकेदाराने मनमानी व चुकीच्या पध्दतीने रस्त्याचे काम पूर्ण केल्याने काल (६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान अवघ्या १५ मिनिटे झालेल्या पावसाच्या पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होऊ न शकल्याने अक्षरशः गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले, तर अंगणातील वाहनेही पाण्यात बुडाली होती.

विशेष म्हणजे १४ ऑक्टोबरला झालेल्या मुसळधार पावसात या भागातील सर्व घरे आणि दुकाने पाण्यात गेल्याने लोकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. मात्र नागरिकांनी सांगूनही या बाबीकडे ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या कामाची पद्धत पाहता भविष्यात पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होणार नसल्याचा व घरांमध्ये पाणी जाण्याचा अंदाज आल्याने रस्त्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी विरोध करत ठेकेदाराला काम थांबावण्याचा आग्रह केला

होता. नागरिकांनी सदर कामाचे वर्क ऑर्डर दाखवण्याची ठेकेदाराकडे वारंवार मागणीही केली होती. मात्र ठेकेदाराने केवळ उडवाउडावीची उत्तरे देऊन कामाबाबत नागरिकांना अंधारात ठेवत मनमानी पध्दतीने काम पूर्ण करण्याची घाई केली. त्यामुळे या कामाबाबत नागरिकांमध्ये भलताच रोष असून, याकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोठ्या प्रसिद्धीत उद्घाटन झालेल्या या कामाशी संबंधित माहितीचे फलक का लावण्यात आले नाही?, कामाचा प्रस्ताव कधी पाठवण्यात आला?, प्रशासनाने कामाला मंजुरी कधी दिली?, नगरपालिकेची यामध्ये काय भूमिका आहे?, या कामाचे इस्टीमेट कधी झाले?, अनुमानित खर्च किती आहे? टीएस कधी मंजूर करण्यात आले?, सदर कामाच्या निविदा (टेंडर) कधी काढण्यात आल्या? किती निविदा आल्या? नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून काम उरकण्याची घाई का करण्यात आली? असे असंख्य प्रश्न उपस्थित करून नागरिक सदर कामाची चौकशी करण्याची मागणी करीत आहेत. नागरिकांच्या समस्यांचं समाधान लवकर करण्यात आले नाही तर संबंधित ठेकेदार आणि कामाशी संलग्न लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे व संबंधितांविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी संबंधित ठेकेदाराच्या सर्व कामांमध्ये पत्रकारांनी लक्ष घातल्यास मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल असे म्हटले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट