सरस्वतीनगरमधील १० वर्षाच्या मुलाचा क्रीडासंकुलामागील शेततलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

या तलावात बुडून आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाला

इंदापूर (२१ सप्टेंबर) :- सरस्वतीनगर (इंदापूर) येथे राहणाऱ्या कुमार आर्यन मच्छीन्द्र नाथजोगी या चौथीत शिकणाऱ्या १० वर्षाच्या मुलाचा क्रीडासंकुलच्या इनडोअर टेनिस कोर्टच्या पाठीमागे (उत्तर दिशेला) असणाऱ्या शेततलावात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचे मृत शरीर तलावातून बाहेर काढण्यात आले. काल (२० सप्टेंबर) सायंकाळी ५ -६ वाजण्याच्या आसपास क्रीडासंकुलाच्या मैदानावर दोघा मित्रांसोबत खेळून झाल्यानंतर आर्यन आणि त्याचे दोघे मित्र हात-पाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेले होते. मात्र पाय घसरून आर्यन शेततळ्यात पडला. यावेळी घाबरून त्याचे दोघे मित्र तेथून पळून आले. या घटनेमुळे घाबरल्याने याची वाच्यता त्यांनी कुठेही केली नाही.

काल सायंकाळी सरस्वतीनगर येथील गणेश मंदिरापाशी खेळत असताना आर्यन बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी इंदापूर पोलीस ठाण्यात केली होती. त्यामुळे इंदापूर पोलीस, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून आर्यनचा सकाळपर्यंत कसून शोध सुरू होता. मात्र आज सकाळी त्याच्या मित्रांनी ही बाब उघड केल्याने सर्वांनी त्वरित शेततळ्याकडे धाव घेतली. शोधअंती आर्यनचे मृत शरीर शेततळ्यात आढळून आले. ही घटना समजताच संपूर्ण भागात शोककळा पसरली. आर्यनचे वडील हे डाळिंब मार्केटमध्ये मजुरीसाठी तर आई सोनाई डेअरीवर कामाला जातात. ते मूळचे लातूर भागाकडचे आहेत.

👆 क्रीडासंकुल, पाठीमागे असलेला तलाव आणि संरक्षक भिंत व तारेच्या कंपाऊंडची दुरावस्था

क्रीडा संकुलच्या मैदानावर सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी, खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्यांची खूप गर्दी असते. त्याला लहान मुलेही अपवाद नाहीत. क्रीडासंकुलाच्या चोहो बाजूंनी वॉल कंपाऊंड आहे. मात्र शेततलावाच्या बाजूने तलावाला चिटकूनच असलेले वॉल कंपाऊंड अतिशय लहान आणि त्यावर असलेली जाळी देखील पूर्णपणे तुटलेली आहे. तर तलावाच्या पश्चिमेला असलेली संरक्षक जाळीही पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या दोन्ही बाजूंनी लहान मुले सहज तलावाच्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे क्रीडासंकुलाची तलावाच्या बाजूने असलेल्या संरक्षक भिंतींची उंची, त्यावरील संरक्षक जाळी अधिक वाढवण्याची व या तलावाच्या पूर्वेकडे असलेली संरक्षक जाळी देखील बदलण्याची गरज असून, या दोन्ही बाबी दुर्लक्षित नसत्या तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती. (बाळासाहेब ढवळे, नगरसेवक, इंदापूर नगरपरिषद)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट