सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा

उपोषणकर्ते अमर जगताप, संतोष जगताप, आप्पासो हगारे 

इंदापूर (२३ सप्टेंबर) :- रस्त्याचे काम पूर्ण होऊन बिलाची रक्कम जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत एजन्सीच्या नावे जमा झाल्यानंतर त्याच कामाची फेरनिविदा काढल्याने ग्रामपंचायत डाळज नं १ आणि ग्रामस्थ असा वाद चांगलाच शिगेला पोहोचलाय. ग्रामपंचायतीने नियमबाह्य व भ्रष्ट कारभार केला असून, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ (कलम ३९) अन्वये संबंधित कामाची चौकशी होऊन सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अमर जगताप, संतोष जगताप आणि आप्पासो हगारे (तिघेही रा. डाळज नं. १) या ग्रामस्थांनी मंगळवारपासून इंदापूर तहसील समोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. मात्र, काम नियमाप्रमाणे झाले असून, केवळ ग्रामसेवक आणि आमच्या अज्ञानपणामुळे फेरनिविदा काढण्याची तांत्रिक चूक झाल्याचे व अद्याप एक रुपायाही खर्च झाला नसल्याने भ्रष्टाचाराचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण सरपंच विकास कुंभार यांनी दिले आहे. तर तिरायत ठेकेदाराने आमच्या परस्पर परवानगी नसताना हे काम केल्याचा हास्यास्पद दावा ग्रामसेवक मुलाणी यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीने डाळज नं - १ मधील जुना आड ते कुंभार आळीपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केल्यानंतर या कामाचे जवळपास ९ लाखांचे बिल जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत एजन्सीच्या नावे वर्ग केले होते. मात्र, कामात झोल झाल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने सदरचे काम नियमबाह्य असल्याचे म्हटले होते. त्या अनुषंगाने पंचायत समितीने ही निविदा रद्द ठरवून संबंधित ठेकेदाराला बिल अदा न करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या होत्या. मात्र हा ठेकेदार कोण? या प्रश्नावर सरपंच आणि ग्रामसेवक दोघांनीही केलेली टाळाटाळ, दिलेली वेगवेगळी उत्तरे, बिल जमा झाल्यानंतर काढलेले टेंडर आणि जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत एजन्सीच्या नावे काढलेल्या बिलामुळे याबाबत संशय निर्माण होत आहे.

या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अनेक महिने उलटल्यानंतरही निष्पक्ष चौकशी झाली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले असून, या प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवक मुलाणी, विद्यमान सरपंच विकास कुंभार, विस्तार अधिकारी बगाडे आणि गटविकास अधिकारी परीट दोषी असल्याचे सांगत दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

ग्रामसेवकाचा हास्यास्पद दावा

रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून, केवळ ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या अज्ञानपणामुळे फेरनिविदा निघाल्याने हा गैरसमज निर्माण झाला असल्याचे सरपंच विकास कुंभार यांनी म्हटले असले तरी, आमच्या परवानगी शिवाय तिरायत ठेकेदाराने परस्पर रस्त्याचे काम पूर्ण करून बिलासाठी तो आमच्याकडे तगादा लावत असल्याचा हास्यास्पद दावा तत्कालीन ग्रामसेवक मुलाणी यांनी केला आहे. सोबतच त्यांनी या कामात अद्याप कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसून, केवळ इ-कोटेशन ऐवजी इ-टेंडर करण्याची तांत्रिक चूक आमच्याकडून झाली असल्याचे म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट