इंद्रेश्वर चौकात स्वच्छतागृहाअभावी नागरिकांची उघड्यावरच लघवी; महिलांसाठी ठरत आहे त्रासदायक
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
शनिवार (२३ जानेवारी) : अनेक मंदिरे, न्यायालय (कोर्ट), तलाठी कार्यालये, दवाखाने आणि बाजारपेठेमुळे नेहमीच वर्दळ असणाऱ्या पांधारानाला (इंद्रेश्वर चौक) परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) नसल्याने नागरिक रस्त्याकडेला अस्वच्छ, उघड्या आणि एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नाला सदृश गटारीचाच स्वच्छतागृह (मुतारी) म्हणून उपयोग करत आहेत. स्वच्छतागृहाअभावी नाईलाजास्तव नागरिक उघड्यावरच लघवी करण्याचे लज्जास्पद कृत्य करत आहेेेत. त्यामुळे नेहमी नागरीकांनी गजबजलेल्या इंद्रेश्वर चौकातून ये जा करणाऱ्या महिलांसाठी ही बाब त्रासदायक ठरत आहे.
इंदापूर शहरामध्ये स्वच्छतागृहांची (मुतारी) समस्या इंदापूरकरांच्या अंगवळणी पडली आहे. ही समस्या खराब रस्त्यांएवढीच गंभीर देखील आहे. दीडशेच्या आसपास खेडी आणि अनेक वाडवस्त्यांवरून नागरिकांना या ना त्या कारणाने इंदापूर शहरामध्ये यावे लागते. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहाची गरज पडल्यास त्यांनी जायचे कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला नसेल तरच नवल. 'महिलांसाठी देखील स्वच्छतागृह असावे' या कल्पनेची कल्पना न केलेलीच बरी. विशेषतः पांधारानाला परिसरात दिवाणी व फौजदारी न्यायालय, तलाठी कार्यालये, अनेक दवाखाने, हॉटेल्स, बाजारपेठ आणि अनेक मंदिरे व चाँदशाहवली बाबांचा ऐतिहासिक दर्गा असल्याने संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या नागरीकांची येथे कायम वर्दळ असते.
स्वच्छतागृहाअभावी नागरिक नाईलाजात्सव इंद्रेश्वर चौकातील मोठ्या, अस्वच्छ आणि खुल्या नाला सदृश गटारीचा स्वच्छतागृह (मुतारी) म्हणून खुलेआम वापर करतात. या गटारीमध्ये पडून एका नागरिकाचा बळी देखील गेला आहे. याच परिसरात इंदापूरचे ग्रामदैवत इंन्द्रेश्वराचे प्राचीन मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, जैन मंदिर, अनेक दवाखाने आणि चाँदशाहवली बाबांची ऐतिहासिक दर्गा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांचीही वर्दळ असते. नागरिक उघड्यावरच लघवी करतानाचे दृश्य नेहमीचेच असल्याने या भागातून जाणाऱ्या सर्रास महिलांना शरमेने मान खाली घालून जावे लागते. पर्यायी स्वच्छ सर्वेक्षणात देशात १० वा क्रमांक, ३ स्टार मानांकनाबरोबरच घनकचरा व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट शहर आणि हागणदारीमुक्तीचा ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त केलेल्या व एकंदरीतच समाधानकारक कामगिरी करत असलेल्या नगरपालिकेबाबतही लोकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. काही सुजाण नागरिक तर लाईटच्या डीपीभोवती केलेल्या तारेच्या कुंपणाचाच स्वच्छतागृह (मुतारी) म्हणून वापर करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
शहराची स्वच्छता राखणे आणि सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे ही वाईट सवय टाळणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असली तरी स्वच्छतागृहाच्या अभावी असे लज्जास्पद प्रकार याभागात रोज अनेक वेळा होतात. नगरपालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांपासून देखील ही बाब लपलेली नाही. व्यापाऱ्यांनी ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. मात्र अद्याप ही समस्या 'जैसे थे' आहे. या भागात कायमस्वरूपी स्वच्छतागृह बांधण्यासाठी व्यापारी, नागरिक, मंदिराचे पुजारी नगरपालिकेला निवेदन देण्याची तयारी करत असले तरी, प्रशासनाच्या चुका, उणिवा आणि नागरिकांच्या समस्यांवर निवेदन दिल्यानंतरच विचार होणार का? असा सवाल सामन्यांना पडणे साहजिक आहे.





स्वच्छता ,सुंदरता या संदर्भात शासनाचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या नगरपालिका साठी शहरातील अस्तित्वात असणारी ही अस्वच्छता भूषणावह नाही.
उत्तर द्याहटवा