बर्ड फ्लू नक्की आहे तरी काय?
देशात कोरोनाचे संकट संपले नसताना देशावर बर्ड फ्लू'चे संकट घोंगाऊ लागले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानसह एक एक राज्य याच्या लपेट्यात येऊ लागले आहे. महाराष्ट्रात अद्याप हे संकट आलेले नाही. महाराष्ट्रासह बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बर्ड फ्लू नक्की आहे तरी काय?
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू किंवा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असेही म्हटले जाते. हा पक्षांच्या लाळ, विष्ठा किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.
बर्ड फ्लूच्या नावातील ‘H’,’N’चा अर्थ काय?
पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे १८ उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे ११ उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यूचे कारण ठरु शकतात. त्यामुळे H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो. यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.
बर्ड फ्लू सर्वात आधी कुठे आढळला, आणि त्याचा इतिहास काय?
भारतातील बर्ड फ्लूचा इतिहास
२००६ साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूने संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणाऱ्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर ५ लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नाही
बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत?
बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणे, घशात खवखव होणे, अथवा जास्त इन्फेक्शन होणे, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळे सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतो
बर्ड फ्लूवर औषध आहे का?
बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळे बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणे सुरु करते. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.
बर्ड फ्लू - अफवा आणि वास्तव
दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. बर्ड फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय कमी आहे. मात्र, त्याचा प्रसार होऊ न देणेही गरजेचे आहे. त्यामुळेच या सगळ्यामध्ये सुवर्णमध्य साधने गरजेचे आहे. खरंच आपल्यापर्यंत बर्ड फ्लू आला आहे का? आणि आला असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरते. कारण, आस्मानी संकटानंतर शेतकऱ्याचे सर्वाधिक नुकसान कुठली गोष्ट करत असेल तर ती आहे अफवा.
कोरोनाला आपण जितके गांभीर्याने घ्यायला हवे होते, तितके सुरुवातीला घेतले गेले नाही, मात्र, जेव्हा बर्ड फ्लूचा प्रश्न येतो, तेव्हा तातडीने पाऊले उचलली जातात. जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, बर्ड फ्लू लगेच सगळ्या राज्यात पसरला असे होत नाही. ज्या राज्यात सध्या बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आली आहेत, तिथल्या प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागाने हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळे घाबरुन न जाता, अफवांना बळी न पडता तथ्य़ जाणून घेणे जास्त गरजेचे आहे.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा