घोडेबाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात
समीर सय्यद (उपसंपादक)
रविवार (१७ जानेवारी) : इंदापूरमध्ये सुरू असलेला घोड्यांचा बाजार देशभरातील घोडे शौकिनांसाठी मेजवानी ठरत असून, घोडेबाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात सुरू आहे. या घोडेबाजाराच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूरचे नांव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, कोट्यावधींची उलाढाल होत असलेल्या या घोडे बाजारात ५० हजारांपासून २५ लाखांपर्यंत किंमतीचे मारवाड, पंजाब, अरबी, जातीच्या घोड्यांसह अनेक जातीचे व गुणांचे घोडे विक्रीसाठी इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील हा एकमेव घोडेबाजार असून, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारा हा घोडेबाजार १० फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. स्वतः उत्तम घोडेस्वार व घोड्यांचे शौकीन असलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे व व्हाईस चेअरमन यशवंत माने यांच्या प्रयत्नांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून होत असलेल्या या घोडे बाजारामध्ये घोडे शौकिनांची होत असलेली गर्दी पाहून देखणा, तगडा आणि ऐटबाज घोडा आपल्याकडेही असावा असे वाटणाऱ्यांची संख्या आजही कमी नाही असेच म्हणावे लागेल. २४ डिसेंबरला सुरु झालेला हा बाजार १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडेबाजामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूरचे नांव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. याशिवाय बाजार समिती दरवर्षी कृषी प्रदर्शन, डॉग शो, जनावरांचे प्रदर्शन, महिलांसाठी होम मिनिस्टर, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करत असते.
५० हजार ते २५ लाखांपर्यंत किंमतीचे मारवाड, पंजाब, अरबी, शिरपूर, कच्छ काठीयावाड, नुकरा पंचकल्याणी, सिंधी, गुजराती, गावरान आदी जातींचे, तर देवमन, पंचकल्याण, चार पाय सफेद, अबलक, अशा अनेक गुणांचे शर्यती व चाली स्पर्धांसाठी, लग्नकार्यासाठी, पर्यटनासाठी उपयोगात येणारे ५०० च्या जवळपास जातिवंत घोडे विक्रीसाठी उत्तरप्रदेश (बरेली), बिहार, गुजरात, पंजाब, हरियाणा या राज्यातून इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. या घोड्यांच्या खरेदीसाठी गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, चेन्नई अशा विविध राज्यांतून व्यापारी गर्दी करत आहेत. हा बाजार इंदापूरकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, झुमके, म्होरकी, बूट, लगाम व घोड्यांचे विविध साज विक्री करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून राबवत असलेल्या या घोडेबाजाराच्या माध्यमातून सबंध देशात इंदापूरचे नांव पोहोचवणे हा एकमेव उद्देश या पाठीमागे असून, या बाजाराचा आर्थिक फायदा व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. भविष्यात इंदापूरचे नांव देशभरात कसे पोहोचेल यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्न करणार आहे - आप्पासाहेब जगदाळे (चेअरमन - कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा