Breaking - इंदापूरचे पी.आय. नारायण सारंगकर यांची उचलबांगडी? अतिरिक्त पदभार गोडसे यांच्याकडे



समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (२५ जानेवारी) : इंदापूर पोलीस ठाण्याच्या इतिहासातील आतापर्यंत सर्वात जास्त वादग्रस्त ठरलेले पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हेे १५ दिवस रजेवर गेले आहेत. मात्र इंदापूर पोलीस ठाण्यातून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याची व बारामती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याकडे इंदापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सारंगकर यांच्यावर आपल्या अधिकारांचा गैरवापर करून इंदापूर पोलीस ठाण्याला सर्वसामान्यांवर अन्याय करण्याचा अड्डा बनवल्याचे अनेक आरोप झाले आहेत. त्यांच्या वादग्रस्त कारभाराची झळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याने मागील अनेक दिवसांपासून इंदापूरमध्ये 'सारंगकर' हेच ब्रेकिंग बातमीचा विषय ठरत होते.

मार्च २०२० मध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या नारायण सारंगकर यांच्यावर मागील १० महिन्यात भ्रष्ट कारभाराचे ढीगभर आरोप झाल्याने ते इंदापूर पोलीस ठाण्याचे आतापर्यंतचे सर्वात जास्त वादग्रस्त पोलीस निरीक्षक ठरले होते. कांदलगाव, बेडशिंग, गागरगांव, रेडणी अशा अनेक गावांतील नागरिकांनी सारंगकर यांच्यावर, चुकीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा, खंडणी मागीतल्याचे, बेकायदेशीररित्या जेलमध्ये डांबल्याचे, खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याचे, फिर्यादींची तक्रार न स्वीकारल्याचे आणि महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे अनेक आरोप केले आहेत.

हे देखील वाचा - पी. आय. नारायण सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे राज्यमंत्र्यांच्या कॉलरपर्यंत

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी, वादग्रस्त कारभाराचा तुरा माथी असलेल्या नारायण सारंगकर यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप करताना इंदापूर तालुक्यातील आरोपकर्त्या सर्व नागरिकांची मूठ बांधत सारंगकर यांच्या विरोधात १९ डिसेंबरला आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. स्वतः राज्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर व पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र कार्यवाही न झाल्याने ९ जानेवारीला बहुजन मुक्ती पार्टीने इंदापूर शहरामध्ये बंद पुकारला होता.

सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराची झळ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही

सारंगकर यांनी खंडणी मागीतल्याचा व न दिल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत सारंगकर यांच्यावर निलंबनाच्या कार्यवाहीच्या मागणीसाठी रेडणी येथील चव्हाण आणि तरंगे कुटुंबियांनी १० जानेवारीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केले होते. उपोषणादरम्यान एका महिलेने भरणे यांना धक्काबुक्की करत त्यांना जाब विचारत असल्याचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रभर वायरल झाला होता. ज्यानंतर सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे राज्यमंत्र्यांच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली होती.

सारंगकर यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टातही दावा

कांदलगांव येथील सुमन गणपत बाबर या महिलेने १४ डिसेंबरला विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचे तात्कालिक कारण इंदापूर पोलीसांनी दिलेली अपमानास्पद वागणूक आणि फिर्याद न घेतल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे सारंगकर यांच्याबरोबरच अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सुमन बाबर यांच्या कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टात दावा दाखल केला आहे.

इंदापूर पोलीसांवरही बेकायदेशीर कृत्य केल्याचे अनेक आरोप

१९ जानेवारीच्या दुपारी सिमरन वसीम शेख ही महिला घरात एकटी असताना जबरदस्ती घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा व तिला उचलून नेहण्याची धमकी दिल्याचा आरोपही इंदापूर पोलीसांवर करण्यात आला होता. तर १९ जानेवारीच्या अपरात्री सिमरन शेख यांचे पती वसीम नजीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सारंगकर यांच्या विरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग असल्याने मला इंदापूर पोलीस खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा आरोप सिमरन यांचे पती वसीम शेख यांनी केला होता. लॉकडाऊनच्या काळात इंदापूर शहरातील प्रतीक सोनी या युवकाने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या पडद्यामागची कारणे शोधली पाहिजेत कारण याचाही संबंध अप्रत्यक्ष इंदापूर पोलीसांशी असल्याची कुजबुज इंदापूर शहरामध्ये अजूनही सुरू आहे.

हे देखील वाचा - इंदापूर पोलीस पुन्हा चर्चेत; जबरदस्ती घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन व उचलून नेण्याची धमकी

शेख प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल मांडगे व पोलीस कॉन्स्टेबल अमित चव्हाण यांच्यासह सामील अन्य पोलीसांवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी शेख कुटुंबीय व बहुजन मुक्ती पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी २३ जानेवारीला घेतलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पावित्र्यानंतर त्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबल मांडगे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. पाठोपाठ आता पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे १५ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. मात्र त्यांची उचलबांगडी करण्यात आली असल्याचीच प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र 'कुंद्यात भोपळा खुशाल राहिला' या म्हणीप्रमाणे आरोपाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमित चव्हाण आणि इतर पोलीसांचे काय? असा प्रश्न अजूनही बाकी आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट