राजकीय अस्तित्वासाठी हर्षवर्धन पाटील यांना उद्याची ग्रामपंचायत निवडणुक महत्वाची
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
बुधवार (१३ जानेवारी) : शुक्रवारी (१५ जानेवारी) होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. वरकरणी या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा हे समीकरण दिसत असले तरी इंदापूर तालुक्यात मात्र आजी मंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असेच काहीसे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभूत झाल्यामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी व भविष्यातील समिकरणांसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही निवडणुक फार महत्वाची ठरणार आहे. इंदापूर तालुक्यात एकूण ११५ ग्रामपंचायती असून, मुदत संपलेल्या ६० ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत ६० ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या भिगवण ग्रामपंचायतीसह, विधानसभेवर प्रभाव टाकू शकणाऱ्या निमगांव, वालचंदनगर अशा अनेक ग्रामपंचायतींचा देखील समावेश आहे. पैकी ३ ग्रामपंचायतीसह (जाचकवस्ती, कचरवाडी, जाधववाडी) ५४ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे ५५६ जागांसाठी १३५२ उमेदवार शुक्रवारी आपले नशीब आजमावणार आहेत. यापूर्वीची ग्रामपंचायत निवडणुक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वबळावर, तर भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती.
इंदापूर तालुक्याच्या पातळीवर विचार केल्यास राजकारणाला समाजकारणाची जोड देत शिवसेना आपली ताकत वाढवत असली तरी अद्यापही शिवसेनेचा प्रभाव अत्यल्प आहे. तर माजी हर्षवर्धन पाटील यांच्या धक्क्याने काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या अनेक दौऱ्यानंतरही दौऱ्यातून बाहेर न आलेली काँग्रेस नेतृत्वहीन आणि दुबळी झाली आहे. जे काँग्रेसी उरले त्यातही गटबाजी व पाटील गट सक्रिय असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीचे पारडे जड वाटत असले तरी राष्ट्रवादीतही गटबाजी सुरू असल्याची चर्चा आहे. तालुक्यातील राजकारण व ग्रामपंचायत निवडणुकीवर प्रभाव टाकू शकणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी या ना त्या कारणाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या गटात उडी मारली होती. तर इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराला भरणे यांचे पाठबळ असल्याच्या आरोपांमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भरणे यांच्या बाबत नकारात्मक चर्चा सध्या सुरू आहे.
एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वर्षपूर्तीनंतरही भाजपाने त्यांना महत्वाचे पद वा जबाबदारी दिलेली नसून, विधानपरिषद 'भी अभी दूर है' असेच चित्र सध्या दिसत आहे. पाटील यांच्या कन्या व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांचा मुक्कामही सध्या काँग्रेसमध्येच आहे. तर इंदापूर शहरातही दोन गट पडल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते व समर्थक अद्यापही आपण कुठे काँग्रेस की भाजपा अशा संभ्रमात वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
शंकरराव पाटील यांच्या माध्यमातून लाभलेली राजकीय पार्श्वभूमी, जवळपास २० वर्ष मंत्रिपद, साखर कारखाने, दुधसंघ, शिक्षण संस्था, बाजार समिती या सर्व जमेच्या बाजू असतानाही हर्षवर्धन पाटील यांच्यावर यापैकी काहीही पाठीशी नसलेल्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सलग दोन वेळा पराभूत होण्याची नामुष्की ओढवली आहे. वरील सर्व प्लस मायनस बाजू पाहता इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय अस्तित्व अबाधित राखण्यासाठी व भविष्यातील समिकरणांसाठी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी उद्याची ग्रामपंचायत निवडणुक महत्वाची व पुढील चित्र स्पष्ट करणारी ठरणार आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा