पी. आय. नारायण सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे राज्यमंत्र्यांच्या कॉलरपर्यंत

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (१२ जानेवारी) : रविवारी (१० जानेवारी) इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर खंडणी मागीतल्याचा व न दिल्याने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाच्या कार्यवाहीच्या मागणीसाठी इंदापूरचे आमदार व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणासाठी बसलेल्या महिलेकडून भरणे यांना धक्काबुक्की करणारा व्हिडीओ महाराष्ट्रभर वायरल झाला होता. हे प्रकरण राज्यमंत्र्यांनी संयमाने हाताळले असले तरी सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे कळत नकळत भरणेंच्या कॉलरपर्यंत  पोहोचणे फार गंभीर बाब आहे.  सारंगकर यांचे इंदापूरमध्ये अधिक वास्तव्य भरणे यांना राजकीयदृष्ट्या आता परवडणार नसल्याने भरणे हे सारंगकर यांची उचलबांगडी कधी करणार याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

रेडणी (ता. इंदापूर) गांवचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व सचिन तरंगे यांच्याकडून ५ लाखांची खंडणी मागीतल्याचा व खंडणी न दिल्याने दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप चव्हाण व तरंगे कुटुंबीयांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर केला आहे. सारंगकर यांच्यावर निलंबनाची कार्यवाही व्हावी व ही मागणी राज्य शासनाच्या दरबारी इंदापूर तालुक्याचे आमदार व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पोहोचावी या उद्देशाने रेडणीच्या (ता. इंदापूर) माजी सरपंच शोभा चव्हाण व शहाबाई तरंगे रविवारी (१० जानेवारी) भरणे यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणासाठी बसल्या होत्या. यावेळी त्यांनी दत्तात्रय भरणे यांना धक्काबुक्की करत त्यांना जाब विचारत असल्याचा व्हिडीओ अवघ्या महाराष्ट्रभर वायरल झाला होता.

याआधीही बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी, नारायण सारंगकर यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त असून, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वरदहस्तानेच ते आपल्या अधिकारांचा गैरवापर करत इंदापूर पोलीस ठाण्याला गुन्हेगारांना वाचवण्याचा आणि सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करण्याचा अड्डा बनवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. १९ डिसेंबरला ऍड. मखरे यांच्या आमरण उपोषणाच्या पावित्र्यानंतर स्वतः दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने आणि पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सारंगकर यांच्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कार्यवाही न झाल्याने ऍड. मखरे यांनी ९ जानेवारीला इंदापूर बंदची हाक दिली होती, जो १०० टक्के यशस्वी झाला होता.

आतापर्यंत कांदलगांव, बेडशिंग, काटी, बळपुडी, गागरगांव आणि रेडणीच्या नागरिकांनी पी.आय. सारंगकर यांच्यावर, चुकीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा, खंडणी मागीतल्याचा, बेकायदेशीररित्या जेलमध्ये डांबल्याचा, खऱ्या गुन्हेगारांना वाचवल्याचा, फिर्यादींची तक्रार न स्वीकारल्याचा आणि महिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माझे कसलेही लागेबांधे नसून, मी वर्दीशी इनाम राखत कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे प्रत्येक बाब हाताळत असल्याचे स्पष्टीकरण पी. आय. नारायण सारंगकर यांनी दिले असले तरी, सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी भरणे यांचे सारंगकरांशी लागेबांधे जोडणे साहजिक आहे.

रेडणीचे प्रकरण भरणेंनी संयमाने हाताळले असले तरी सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराचे शिंतोडे कळत नकळत राज्यमंत्र्यांच्या कॉलरपर्यंत पोहोचणे गंभीर बाब आहे. कोणताही लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतले प्रशासकीय अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात आणतो हे वास्तव्य असले तरी पी. आय. ननारायण सारंगकरांचे इंदापूरमध्ये अधिक वास्तव्य आता भरणे यांना राजकीयदृष्ट्या परवडणार नसल्याने सामान्य प्रशासन राज्यमंत्री भरणे हे सारंगकर यांची उचलबांगडी कधी करणार याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, उचलबांगडी झालीच आणि ती केवळ बदली करण्यापर्यंत मर्यादित असेल तर, आपली समस्या इतरांच्या गळ्यात घालण्यासारखाच हा प्रकार म्हणावा लागेल. बघुयात समस्या संपते का इतरांच्या गळ्यात पडते ती.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट