बेकायदेशिर पिस्टल विक्री करणारी टोळी गजाआड; १० राऊंडसह ७ पिस्टल हस्तगत


समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

बारामती (२८ जानेवारी) : मध्यप्रदेशहून विक्रीसाठी आणलेल्या बेकायदेशीर ७ गावठी पिस्टल आणि १० राऊंडसह बारामती पोलीसांनी एकूण २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणी ५ सराईत गुन्हेगारांना काल (२७ जानेवारी) रुई पाटी (ता. बारामती) या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही या वर्षातील सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. वरील गुन्ह्यातील अदिनाथ ईश्वर गिरमे हा आरोपी हॉटेल चालकास मारहाण करून पैसे लुबाडण्याच्या आणखी एका गुन्ह्यामध्ये बारामती तालुका पोलीसांच्या रडारवर होता.

सविस्तर वृत्त असे की, हॉटेल चालकास मारहाण व पैसे लुबाडल्यासंबंधी दरोड्याचा प्रकरणात बारामती तालुका पोलीसांच्या रडारवर असलेला अदिनाथ ईश्वर गिरमे (वय २१ वर्षे, रा. पाटस, ता. दौड जि. पुणे) हा आरोपी काल (२७ जानेवारी) आपल्या इतर साथीदारांसह रुई पाटी (ता. बारामती) याठिकाणी बेकायदेशीर गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे आणि विजय वाघमोडे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सापळा रचून, वरील आरोपी आणि विजय रामदास कराड (वय २० वर्षे, रा. टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड), अमोल रमेश गर्जे (वय २२ वर्षे, रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांच्यासह एकूण ५ जणांना अटक केली आहे.

हे देखील वाचा - इंदापूर पोलीस ठाण्याचे पी. आय. सारंगकर यांची उचलबांगडी?

पोलीसांनी या सर्व आरोपींकडून ७ गावठी पिस्टल आणि १० राऊंड्स आणि एक ऍक्टिव्हा मोटार सायकल (एम. एच. ४२ एव्ही ०६८१) असा एकूण २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपींनी या पिस्टल्स मध्यप्रदेशहून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली असून, त्यांच्यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमान्वये एकूण ५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

बारामती उपविभागामध्ये सन २०२० मध्ये एकूण २० बेकायदेशीर गावठी पिस्टल्स हस्तगत करण्यात आल्या होत्या. तर २०२१ मध्ये आतापर्यंत ८ गावठी पिस्टल्स हस्तगत करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बेकायदेशीर पिस्टल विक्री संदर्भातील पुणे ग्रामीण पोलीस दलातील ही सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे.

हे देखील वाचा - इंद्रेश्वर चौकात स्वच्छतागृहाभावी नागरिकांची उघड्यावरच लघवी; नगरपालिकेचे दुर्लक्ष

सदरची कार्यवाही पुणे ग्रामिणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादा ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, राहुल पांढरे, विजय वाघमोडे, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे, दत्तात्रय मदने आणि रणजित मुळीक यांनी केली आहे.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट