मृतांच्या अंगावरील ९ तोळे सोने नातेवाईकांच्या स्वाधीन करणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकाचा इंदापूर शिवसेनेकडून सन्मान

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (४ जानेवारी) : काल (३ जानेवारी) सकाळी विठ्ठलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) गांवच्या हद्दीत ट्रक आणि कारची समोरसमोर धडक होऊन पांडुरंग सीताराम ताथवडे (वय ५८ वर्ष) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्ष) या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी व मृतांच्या अंगावरील अंदाजे ९ तोळे सोने आणि ३५ हजार रोख रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करणारे रुग्णवाहिका चालक 'नितीन खिलारे' यांचा इंदापूर शहर शिवसेनेच्या वतीने आज (४ जानेवारी) सत्कार व ५ हजार रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.

रविवारी (३ जानेवारी) सकाळी ७ वा. ४५ मी. सुमारास सैन्यात शहीद झालेल्या आपल्या सहकारी मित्राच्या मुलाच्या लग्नासाठी अकलूज येथे आपल्या नेक्साॅन कंपनीच्या कारमधून (एमएच ४२ आरएफ २६६२) जात असताना केंदूर पाबळ (ता. शिरूर, जि. पुणे) येथील सेवानिवृत्त माजी सैन्य अधिकारी (सुभेदार मेजर) पांडुरंग सीताराम ताथवडे व त्यांच्या पत्नी रुक्मिणी पांडुरंग ताथवडे यांचा विठ्ठलवाडी गावाच्या हद्दीत अपघात होऊन मृत्यू झाला होता.

योगायोगाने अपघातानंतर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेले रुग्णवाहिका चालक 'नितीन खिलारे' यांनी पोलीसांना माहिती व मदतकार्य तर केलेच, परंतु मृतांच्या अंगावरील अंदाजे ९ तोळे सोने आणि ३६ हजारांची रोख रक्कम मृतांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करत मढ्याच्या टाळूवरील लोणी खायला कमी न करणाऱ्या या कलयुगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून माणुसकी अद्याप जिवंत असल्याचे प्रमाण दिले आहे.

हे देखील वाचा - डॉ. शिरीष साळुंके यांची सशस्त्र दलाच्या कॅप्टन पदी नियुक्ती; पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये देणार सेवा

परळ-एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मेलेल्या महिलांच्या अंगावरील सोने आणि साक्री शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने रूग्णालयातून गायब केल्याची कलयुगातील अशी लाखो उदाहरणे डोळ्यासमोर असताना जात आणि धर्माच्या भिंती ओलांडून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून एक हजार पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवणारे व समाजसेवेतून ‘स्व’ सापडलेले 'नितीन खिलारे' यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते जलद रुग्णवाहिका सेवा देण्यास व अडीअडचणीत लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच की काय दोन तासांपेक्षा जास्त वेळ त्यांची रुग्णवाहिका थांबून राहिली तरच नवल.

हे देखील वाचा - विठ्ठलवाडी नजीक ट्रक आणि कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू

'नितीन खिलारे' यांच्या कामाचा गौरव, प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडावी या उद्देशाने राजकारणाबरोबरच समाजकारणाचा वसा उचललेल्या इंदापूर शहर शिवसेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात 'नितीन खिलारे' यांचा सत्कार आणि ५ हजारांची रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख नितीन शिंदे, शहरप्रमुख मेजर सोमवंशी, उपशहर प्रमुख बंडू शेवाळे, माथाडी कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस दुर्वास शेवाळे, शाखा प्रमुख व माजी सैनिक संघटना सचिव रविराज पवार, अवधूत पाटील उपस्थित होते.

नितीन खिलारे यांचे समाजकार्य आणि प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. आम्ही केलेल्या सन्मानापेक्षा नक्कीच ते अधिक सन्मानाचे पाईक आहेत. यासाठीच इंदापूर तालुका शिवसेना 'नितीन खिलारे' यांचा राज्य पातळीवर सन्मान करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे - नितीन शिंदे (शिवसेना इंदापूर तालुकाध्यक्ष)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट