विठ्ठलवाडी नजीक भरधाव ट्रक आणि कारचा अपघात; कारमधील दोघांचा जागीच मृत्यू

अपघात झालेल्या धोकादायक वळणावर गतिरोधक न बनवल्यास स्थानीक नागरिक प्रशासनाविरोधात करणार आंदोलन.

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

इंदापूर (३ जानेवारी) : आज सकाळी ७ वाजून ४५ मी. सुमारास विठ्ठलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) गांवच्या हद्दीत धोकादायक असलेल्या वळणावर टाटा कंपनीचा ट्रक आणि नेक्साॅन कारची समोरसमोर धडक होऊन कारचालक पांडुरंग सीताराम ताथवडे (वय ५८ वर्ष) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्ष) या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला असून, या अपघातानंतर अपघातास कारणीभूत ट्रक चालक फरार झाला आहे. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध वाहन हयगयीने चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अपघाताची माहिती न देताच निघून जाणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, इंदापूर नजीक विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत वळणावर आज (३ जानेवारी) सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास इंदापूरच्या दिशेने निघालेल्या टाटा कंपनीच्या ट्रक (एमएच ४२ एमव्ही ७४३४) आणि अकलूजच्या दिशेने निघालेल्या नेक्साॅन कंपनीच्या कारची (एमएच ४२ आरएफ २६६२) समोरासमोर धडक होऊन कारमधील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. पांडुरंग सीताराम ताथवडे (वय ५८ वर्ष) आणि रुक्मिणी पांडुरंग ताथवडे (वय ५० वर्ष) (दोघेही राहणार खडकी, पुणे, मूळ गांव केंदूर पाबळ, ता शिरूर, जि. पुणे) अशी मृतांची नांवे आहेत. धडक झाल्यानंतरही ट्रक चालकाने वाहन न थांबवता तब्बल १५०-२०० फूट कारला फरफटत नेहल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, अपघातानंतर ट्रक चालक अपघाताची माहिती न देताच घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाला आहे.

हे देखील वाचा - डॉ. शिरीष साळुंके यांची कॅप्टन पदी नियुक्ती; पुण्यातील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये देणार सेवा

खिलारे गुरुजी रुग्णवाहिकेचे चालक नितीन खिलारे (रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर) हे रुग्णवाहिकेच्या किरकोळ दुरुस्तीनिमित्त सकाळी अकलूजकडे निघाले असता, त्यांच्या समोरच हा अपघात घडल्याने त्यांनी त्वरित इंदापूर पोलीसांना याबाबत कल्पना दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह कारमधून बाहेर काढले. पोलीसांनी मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना या अपघाताची माहिती दिली. वाहन हयगयीने चालवणे, अविचाराने चालवणे, वाहतूक नियमांना पायदळी तुडवत वाहन चालवत कारमधील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने फरार अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध समक्षदर्शी नितीन खिलारे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गतिरोधक बनवण्याची मागणी - ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते वळण अतिशय धोकादायक असून वाहने बेफाम वेगाने जातात. या वळणावर याआधीही अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच ठिकाणी एसटीचा थांबा असल्याने विठ्ठलवाडी गावातील शाळेय विद्यार्थी आणि नागरिक यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूला गतिरोधक बनवण्यात यावेत व सुुचना फलक लावण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे. संबंधित विभागाने याची त्वरित दखल घेतली नाही तर स्थानिक नागरिक आंदोलन करतील असे नागरिकांकडून सांगण्यात आले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट