इंदापूर पोलीस पुन्हा चर्चेत; जबरदस्ती घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन व धमकी दिल्याचा पोलीसांवर आरोप
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
इंदापूर (२० जानेवारी) : इंदापूर पोलीस ठाणे या ना त्या कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत असून, इंदापूर पोलीसांनी घरामध्ये कोणीही नसताना जबरदस्ती घरात घुसून असभ्य वर्तन केल्याचा व उचलून घेऊन जाण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप सिमरन वसीम शेख या महिलेने इंदापूर पोलीसांवर केला आहे. इंदापूर शहरातील शेखमोहल्ला याठिकाणी मंगळवारी (१९ जानेवारी) दुपारी ३ च्या सुमारास हा प्रकार घडला असून, इंदापूर पोलीस ठाण्यात तब्बल ३ तास विनवण्या करून देखील सदर पोलीसांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली नसल्याचा आरोपही या महिलेने केला आहे. तर या महिलेच्या पतीने आपल्यालाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप इंदापूर पोलीसांवर केला आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराविरोधातील वादळ अजून शमले नसताना, घरात एकटी असताना जबरदस्ती घरात घुसून इंदापूर पोलीसांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप सिमरन वसीम शेख यांनी इंदापूर पोलीसांवर केला आहे. इंदापूर शहरातील शेखमोहल्ला याठिकाणी आपल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या सिमरन वसीम शेख ह्या मंगळवारी (१९ जानेवारी) दुपारी ३ वा. च्या सुमारास आपल्या घरामध्ये जेवण करत असताना इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे यांनी अचानक घरात घुसून आतून दरवाज्याची कडी लावत तुझे पती कुठे आहेत?, गुटख्याचा माल कुठे लपवला आहे सांग? नाहीतर तुला उचलून घेऊन जातो अशी धमकी दिल्याचे सिमरन शेख यांनी म्हटले आहे.
सिमरन यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांना ढकलून देत कॉन्स्टेबल मांडगे यांनी दरवाजा उघडला. मात्र, यावेळी बाहेरील पोर्चमध्ये उभ्या असलेल्या इतर तीन पोलीसांनीही पती नसल्याने या महिलेलाच घेऊन जाण्याची भाषा वापरली. गंभीर बाब म्हणजे पोलीसांकडे कोणताही सर्च वॉरंट आणि महिला पोलीसही बरोबर नसताना पोलीसांनी हे कृत्य केले असून, पोलीसांच्या अशा बेकायदेशीर आणि गुंड प्रवृत्तीच्या वागणुकीमुळेच सामान्य माणूस गुंडांना कमी आणि पोलीसांना जास्त घाबरत असल्याचा आरोप सिमरन यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
हा प्रकार घडल्यानंतर इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल ३ तास विनवण्या करून देखील सदर पोलीसांविरोधात आपली तक्रार घेण्यात आली नसल्याचे सिमरन यांनी म्हटले आहे. याआधीही असाच आरोप कांदलगांव (ता. इंदापूर) येथील सुमन गणपत बाबर या महिलेने इंदापूर पोलीसांवर केला होता. "कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर आम्ही न्याय मागायचा कुठे" असा उद्विग्न सवाल करत वरील गंभीर प्रकाराचा खुलासा करणारा व तक्रार दाखल करून घेण्याची विनंती करणारा अर्ज सिमरन यांनी इंदापूर पोलीस ठाण्यासहित बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केला आहे. तर याबाबत सिमरन यांनी घडलेला प्रकार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पीए यांनादेखील फोनवरून सांगितला असल्याचे म्हटले आहे.
पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्या वादग्रस्त कारभाराविरोधी आंदोलनात आपला सक्रिय सहभाग व पोलीसांच्या, कायद्याला काळिमा फासणाऱ्या, महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या आणि सामान्यांच्या मनात पोलीसांविरोधात द्वेष आणि भय निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्याविरोधात सिमरन हिने आवाज उठवल्यानेच इंदापूर पोलीस मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा व कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिमरन यांचे पती वसीम नजीर शेख यांनी म्हटले असून, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे, कॉन्स्टेबल चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असा विनंती अर्ज वसीम शेख यांनी पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांना केला आहे. वरील आरोपांमध्ये तथ्य असेल तर मग इंदापूर पोलीसांचे हे कृत्य समाजहिताच्या दृष्टीने घातक व पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दरी वाढवणारे व पोलीसांविषयी विश्वासार्हता कमी करणारे ठरणार आहे.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा