काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण सदस्य

समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

शनिवार (२३ जानेवारी) : १५ जानेवारीला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचे (२९ वर्ष) व या निवडणुकीमधील इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त शिक्षित उमेदवार असणारे विपुल बबन वाघमोडे विजयी झाले आहेत. लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, आता माझा कुणीही विरोधक नसून, केवळ विकासकामांच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देत लोकांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

इंदापूर तालुक्यात ५५६ जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १३५२ उमेदवार, तर काटी (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मुख्य आकर्षण ठरलेले विपुल बबन वाघमोडे काटी ग्रामपंचायतीच्या इतिहासात निवडून येणारे सर्वात कमी वयाचे उमेदवार ठरले आहेत. अवघे २९ वर्ष वय असणारे विपुल यांचे आजोबा आणि वडील दोघांनीही भूतकाळात सरपंच पदाच्या माध्यमातून गांवाच्या विकासकामात हातभार लावला होता. विपुल यांनी कृषी पदवी व एम.बी.ए. चे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

काटी गांवातील विकासकामांमध्ये राहिलेल्या त्रुटी दूर करून नागरिकांच्या गरजा व समस्या जाणून घेत, थांबलेला विकासकामांचा गाडा पुढे नेण्यासाठी आणि घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी केवळ समाजकारणासाठी राजकारणाच्या मैदानात उतरलेले विपुल वाघमोडे यांनी, एवढ्या कमी वयात लोकांनी टाकलेला विश्वास समर्थक आणि विरोधक हा फरक न करता केवळ विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरवणार असल्याचे सांगताना, आता आपला कुणीही विरोधक नसून गांवाचा विकास हेच आपले अव्वल ध्येय असल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा - इंदापूर पोलीसांची करामत; जबरदस्ती घरात घुसून महिलेशी असभ्य वर्तन व धमकी

स्पर्धा परीक्षेचे अनन्यसाधारण महत्व ओळखून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचलनालयाची सुविधा, पिण्याचे तसेच वापराच्या पाण्याचे योग्य नियोजन, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, कचरा व्यवस्थापन आणि वृक्षारोपणावर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वतः कृषी पदवीधर असल्याने गांवातील शेतीमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठीही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट