टाऊन हॉलचे कंपाऊंड महत्वाचे? का धोकादायक अवस्थेतील भार्गवराम तलावाची पुरातन तटबंदी?

संपादकीय

इंदापूर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या, तथा इंदापूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या भार्गवराम तलावाची दगडी तटबंदी सध्या धोकादायक अवस्थेत असून, संबंधित प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास या पुरातन तलावाच्या ऐतिहासिक खुणा नामशेष होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या बाग म्हणून वापरात असलेल्या या तलावाची तटबंदी जवळपास ३०० वर्ष पुरातन आहे. तलावाच्या उत्तर बाजूने पूर्व-पश्चिम अशी अंदाजे ३०० ते ३५० मीटर लांब असलेल्या या दगडी तटबंदीची प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झाली आहे. परिणामी ती ढासळून अपघात होण्याचाही धोका निर्माण झाला आहे. याआधी तलावाची पूर्व बाजूची अंदाजे ३०-४० मीटर तटबंदी ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिृष्टीमध्ये ढासळली होती. तटबंदीचा ढासळलेला तो भाग ३ वर्षानंतर आजही जैसे थे अवस्थेत आहे. परिणामी तटबंदीच्या भराव्यावरून अकलूज लिंक रोडने वाहतूक करणे नागरिकांना त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे.

या दगडी तटबंदीवर लिंब आणि वडाची अनेक झाडे नैसर्गिकरीत्या उगवली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही झाडे आता सावली देण्याइतपत मोठी झाल्याने साहजिकच या झाडांच्या मुळ्या तटबंदीत खोलवर पसरल्या आहेत. परिणामी तटबंदीची दगडे निखळून तटबंदीला आतील बाजूने डोबळे पडले आहेत. संपूर्ण तटबंदीची कमीजास्त प्रमाणात हीच अवस्था आहे. काही वर्षांपूर्वी तलावाच्या तटबंदीला खेटून वायफाय आणि टेलिफोन केबलसाठी चारी खोदण्यात आली होती. या चारीत पावसाचे पाणी मुरत असल्याने तटबंदी अधिक कमकुवत झाली. परिणामी उरलेली तटबंदी कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे. त्यातच बागेत खेळताना लहान मुले अनेकवेळा तटबंदीनजीक जातात. त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.


वरील परिस्थिती अनेकांनी, अनेकवेळा, अनेक पद्धतीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र अद्याप यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे तटबंदीच्या अवघ्या काही मीटर अंतरावर टाऊन हॉलच्या कंपाऊंडचे काम सुरू आहे. या कंपाऊंडवर कोट्यवधी खर्च केले जात असताना ३०० वर्षांपूर्वीची पुरातन तटबंदी इतिहासजमा होत असताना याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? ऐंशी तेथे पंच्याऐंशी. कंपाऊंड गरजेचे, का धोकादायक झालेली पुरातन तटबंदी वाचवणे महत्वाचे? भ्रष्टाचारयुक्त रस्त्यांच्या कामांनाच विकास म्हणून मिरवणारे तालुक्याचे विकासरत्न कोट्यवधींच्या निधीपैकी ओंजळभर निधी इकडेही वळवतील का? असे अनेक प्रश्न इंदापूरकरांना पडले आहेत.


हत्वाचे म्हणजे उपाययोजनांच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासनाने जुन्या तहसील कचेरीतील १५०-२०० वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड तोडले होते. बुडाखालची माती निघत चालल्याने धोकादायक झालेले हे झाड वाचवण्यासंबंधी उपाययोजना करण्याची मागणी होत होती. मात्र उपाययोजनांऐवजी १६ जून रोजी झाड अयोग्य पद्धतीने तोडण्यात आले. परिणामी झाडावरील अनेक परदेशी चित्रबलाक पक्षी आणि वटवाघूळांचा जीव गेला. आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी झाड पाडण्यासंबंधी अर्ज आल्याच्या अफवाही माजवल्या. काही मुर्खांनी माध्यमांकडेही बोट दाखवले. हा निव्वळ वेडेपणाच की. आता या तटबंदीच्या प्रकरणातही उपाययोजनांचा भलताच अर्थ घेऊन नगरपरिषद प्रशासनाने तलावाची तटबंदीच पाडू नये म्हणजे झालं. बरं प्रशासन तसं करूच लागलं तर समाजातल्या जबाबदार लोकांनी फेसबुक लाईव्ह करण्यापेक्षा सुरू प्रकार थांबवण्याची थोडी हिंमत दाखवावी. असो ! "इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते" या म्हणीप्रमाणे सर्वच जनतेच्या इच्छेप्रमाणे घडेलच असे नाही. शेवटी संबंधित प्रशासनाने कृती करणे महत्वाचे.....!!!

टिप्पण्या

  1. महत्वाचे असलेलेच विषय तुम्ही लावता. हा विषय पण महत्वाचा आहे. तटबंदी कोसळली तर एखाद्याचा जीव जाईल. कोसळलेली तटबंदी 3 वर्षानंतरही तशीच आहे. कोट्यावधी चा निधी नेमकांजातो कुठे?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट