इंदापूर बस स्थानकात चोरट्यांचेच राज्य; महिला प्रवाशाचे ११ तोळे सोने चोरीला; राजेवलीनगरमध्येही भर दिवसा चोरी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१९ ऑगस्ट) :- एसटीमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाच्या बॅगेतील जवळपास ११ तोळे सोने चोरट्यांनी गडप केले. आज सकाळी ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकरासंदर्भात चिन्मय गिरीश देशपांडे (रा. भारती टॉवर्स, अंबिकानगर, इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इंदापूर बस स्थानकात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना पाहता इंदापूर बस स्थानक प्रवाशांच्या लुटीचे केंद्र ठरत असल्याचे, तथा इथे चोरट्यांचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
चिन्मय देशपांडे आपले वडील आणि पत्नीसह बार्शीला निघाले होते. यावेळी एसटीमध्ये चढत असताना हा प्रकार घडला. त्यांच्या पत्नीकडे असणाऱ्या बॅगेतून चोरट्यांनी साडेतीन लाखांच्या आसपास किंमतीचे ११ तोळे सोने ठेवलेले पाकीट गर्दीचा फायदा घेऊन लंपास केले. बसमध्ये चढताना खूप गर्दी असल्याचे, तसेच पत्नीच्या आसपास चार ते पाच महिला असल्याचे फिर्यादी यांनी म्हटले आहे. हा प्रकार पोलिसांना कळवताच सदर ठिकाणाचे सीसीटिव्ही पोलिसांकडून तपासण्यात आले. मात्र मागील घटनांची पार्श्वभूमी पाहता यातून काही निष्पन्न होईल याची शास्वती कमीच आहे. इंदापूर पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल बड्या शिताफीने केली आहे. यामध्ये एटीएम फोडी आणि सरडेवाडी खून प्रकरणाचा उल्लेख करावा लागेल. हे कौतुकास पात्र आहेच. परंतु या बाबतीत मात्र इंदापूर पोलीस का आणि कुठे कमी पडत आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
हे देखील वाचा - चायनीज मांजामुळे इंदापूरकर जखमी होण्याच्या घटना अद्यापही सुरूच
मागे अशाच एका घटनेत फिर्यादीने अज्ञात महिलेवर संशय व्यक्त केला होता. मात्र ही महिला नेमकी कोण? महिला एक आहे का टोळी? याचा थांगपत्ता अनेक चोरीच्या घटना घडल्यानंतरही लागलेला नाही. परिणामी इंदापूर बस स्थानकातून प्रवास करणे प्रवाशांसाठी, विशेषतः महिला प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खरं तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात पोलीस मदत केंद्रही आहे. परंतु त्याचा उपयोग एसटी कर्मचाऱ्यांच्या आरामासाठी होत आहे. ही बाब अनेकवेळा वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र परिस्थिती अद्यापही जैसे थे आहे. किमान या घटनेनंतर बोध घेत पोलीस प्रशासन योग्य पाऊले उचलेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
राजेवलीनगरमध्ये भर दिवसा चोरी...
इंदापूर शहरातील राजेवलीनगरमध्ये फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७३ हजारांचा ऐवज लंपास केला. बुधवारी (१६ ऑगस्ट) भर दिवसा घडलेल्या या घटनेबाबत सतिश जगन्नाथ मोरे (रा. अशोक अपार्टमेंट राजेवलीनगर, इंदापूर) यांनी गुरुवारी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आश्चर्य आणि चोरट्यांचा सुळसुळाट मान्य करावा लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा